कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका प्रशासनाने शहरात येणाऱ्या बाहेरील वाहनांवर ‘प्रवेश कर’ (टोल) आकारण्याचा अत्यंत चुकीचा आणि तुघलकी निर्णय घेत आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येत आहे. हा ठराव आणताना प्रशासनाने कोणताही ठोस अभ्यास केलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकार आधीच जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून मोक्कार करवसुली करत असताना, आता महापालिकेनेही जनतेला लुटण्यासाठी हा नवा फंडा शोधून काढला आहे. जनतेवर टोलचा भार टाकण्यापेक्षा महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली ‘टक्केवारी’ आणि ‘भ्रष्टाचार’ थांबवावा, अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली.

महापालिकेत सध्या विकासकामांची अंदाजपत्रके जाणीवपूर्वक फुगवून त्यातून स्वतःची टक्केवारी काढायची आणि दुसरीकडे शहराच्या विकासाचे नाव पुढे करून सर्वसामान्य जनतेच्या माथी टोल मारायचा, ही अत्यंत घाणेरडी व चुकीची पद्धत सुरू आहे. कोल्हापूर महापालिकेच्या भ्रष्ट कारभाऱ्यांनी आजवर महापालिका दोन्ही हातांनी लुटली आहे. आता या कारभाऱ्यांना त्यांच्या टक्केवारी आणि भ्रष्टाचारासाठी पैसा कमी पडू लागल्यानेच, त्यांनी हा कर आकारणीचा घाट घातला आहे, असा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

ग्रामीण जनतेमध्ये संताप

महापालिकेने केवळ ‘ एम एच ९ (कोल्हापूर) पासिंग वगळता इतर सर्व वाहनांवर कर लावण्याचा घाट घातला आहे. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातीलच नवीन पुनर्रचित इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यांतील वाहनांचे पासिंग ‘ एम एच ५१’ आहे. हे लोक रोज विविध कामांसाठी, बाजारपेठेसाठी आणि उपचारांसाठी कोल्हापूर शहरात येतात. जिल्ह्याचेच नागरिक असलेल्या या वाहनधारकांवर आणि इतर कोणत्याही वाहनावर अशा प्रकारे अन्यायकारक टोल लादणे अत्यंत अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, जनक्षोभ उसळला आहे.

आक्रमक आंदोलन उभारणार

स्वाभिमानी शेतकरी संघटना या जनविरोधी निर्णयाला पूर्ण ताकदीने विरोध करत आहे. कोल्हापूर शहरात येणाऱ्या केवळ एम एच ०९/५१ च नव्हे, तर कोणत्याही वाहनाला टोल किंवा प्रवेश कर आकारू नये, ही आमची ठाम मागणी आहे. महापालिका प्रशासनाने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून महापालिकेच्या विरोधात आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे महापालिका प्रशासन आणि येथील भ्रष्ट कारभारीच जबाबदार असतील, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.