महापुरावेळी संरक्षणातील अपयशाबद्दल कारवाई आदेशावर संतप्त प्रतिक्रिया
कोल्हापूर : महापूर काळात पशु संगोपन, संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित मालकावर प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत. या निर्णयावर शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. तर, पशुसंवर्धन विभागाच्या दारात कोल्हापुरी पायतान घेऊन जाब विचारला जाईल, असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतला आहे.

पूर बाधित गावातील जनावरे वाहून गेली, त्यांच्या चारा-पाण्याची योग्य व्यवस्था झाली नाही तसेच या कामी पशुपालकांचा हलगर्जीपणा सिद्ध झाला तर संबंधित मालकांवर प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त डॉ. ए. वाय. पठाण यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यांच्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकरी जनावरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो. महापुरासारख्या आपत्तीमध्ये जनावरांची काळजी कसोशीने घेतली जाते. पण काही वेळा दुर्घटना घडतात. परंतु अधिकारी खुर्चीत बसून मनमानी पद्धतीने आदेश करीत असतात. आताचा हा आदेश मागे घेतला नाही तर स्वाभिमानी पशुसंवर्धन विभागाच्या दारात कोल्हापुरी घेऊन जाब विचारेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

इचलकरंजीतही विरोध
गेल्या महापुराची नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही. अशातच पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचे सोडून पशुधन वाचवण्याची जबाबदारी न घेता जनांवरच्या मालकांना जबाबदार धरण्याचा अजब फतवा काढला आहे. तो मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन अमृत भोसले, रवींद्र लोहार, किरण सूर्यवंशी, विश्वास बालिघटे, सुरेश सासणे आदींनी प्रांताधिकारी यांचे शिरस्तेदार श्री काटकर यांना दिले आहे.