कोल्हापूर : दिलेला शब्द पाळायचा की पुन्हा एकदा खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवावे. पण आता मीदेखील या पक्षाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करणार, अशा शब्दात इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला उद्देशून दिला आहे.

माजी खासदार शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी केलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली असून शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही; परंतु ही माहिती प्रसारित होताच त्यावर संतप्त होत शेट्टी यांनी आज राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे.  गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून लोकांच्या मनातील माझे स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही. या स्थानावरच आम्ही शब्द न पाळणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

जलसमाधी आंदोलन…पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेट्टी यांनी बुधवारपासून पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा उद्या रविवारी नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. शेट्टी यांच्या या आंदोलनावरून प्रशासन सज्ज झाले आहे. नरसिंहवाडी येथे जाणारे रस्ते रोखण्यात आले असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. तर शेट्टी यांना मार्गातच रोखण्याची नीती अवलंबण्यात येण्याची चिन्हे आहेत. असे झाले तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी कावा करण्याची शक्यता आहे.