कोल्हापूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची केवळ घोषणा करू नये. ही रक्कम क्रांती दिना पूर्वी शेतकऱ्यांना मिळाली नाही तर पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये खात्यावर जमा करावेत यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील दसरा चौकातून मोर्चा काढला. भर पावसात हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. कर्ज फेडीचे पैसे सत्वर खात्यात जमा करा अशा घोषणा दिल्या जात होत्या.  शेतकऱ्यांकडून चाबकाचे फटकारे मारले जात होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली.  त्यांनी राज्य शासन तसेच लोकप्रतिनिधींना टीकेचे लक्ष्य केले. आज पाऊस असल्याने मोर्चात छत्र्या घेऊन आलो आहे. उद्या याचे भाले होतील हे लक्षात ठेवले पाहिजे, असा इशारा देऊन शेट्टी म्हणाले, याबाबत मागील मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णय केला. त्याला विद्यमान मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिली आता. तेच ट्विट करून शासन निर्णय होणार असल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ घोषणा करू नका; तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असा शासन निर्णय करावा.  राज्य शासनाने हा निर्णय घेतला नाही तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. मुख्यमंत्र्यांना निवेदन देणाऱ्या लोकप्रतिनिधी मधील एकाची आई तर दुसऱ्याचा भाऊ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहे. त्यांनी निवेदन देण्यापूर्वी या प्रश्नांतील अडचणी काय आहेत हे जाणून घेतल्या असत्या तर बरे झाले असते, असा टोला त्यांनी लगावला.  निवेदनाचे नाटक करून काही साध्य होणार नाही. या मागणीसाठी आमचा हा तिसरा आहे. गेल्या मोर्च्याच्या वेळीही हे खासदार शासनाकडे गेले होते. पण त्यातून काही साध्य झाले नाही. आता शासनाच्या घोषणेवर विश्वास नाही. प्रत्यक्षात हे पैसे मिळाले पाहिजेत; अन्यथा क्रांती दिनी राष्ट्रीय महामार्गावर उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.