दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा जिंकण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये जोरदार चुरस असली तरी या निकालाचे राजकीय परिणाम कोल्हापूरच्या राजकारणावर उमटणार आहेत. यामुळेच कोणता कोल्हापूरकर मल्ल ही लढाई जिंकणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

Kolhapur, Hatkanangle, election battle,
कोल्हापूर, हातकणंगलेत चुरस वाढली
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Prataprao Jadhav
बुलढाणा : राजकीय स्थित्यंतराचा असाही नमुना, एकेकाळी लढले एकमेकांविरोधात अन् आता…

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार तर भाजपचे धनंजय महाडिक हे सहाव्या जागेसाठी नशीब अजमावीत आहेत. दोघेही कोल्हापूरकर.

कोण बाजी मारतो त्यावर कोल्हापूरच्या भविष्यातील राजकारणावर   परिणाम होणार आहेत. त्याचे पडसाद लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांवरही होणार आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेनंतर राज्यसभेची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाचा अचानक केंद्रिबदू बनली आहे.

राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्याचे नाव तसे फारसे कधी येत नसे. राज्यसभेचे दिवंगत खासदार आबासाहेब खेबुडकर कुलकर्णी सांगलीचे असले तरी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव राहिला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती कोटय़ातून खासदार झाल्याने त्यांची चर्चा झाली. आता राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर संभाजीराजे हे कोल्हापुरातून राज्यसभेसाठी आलेले पहिले नाव बाजूला पडले. दुसरीच दोन नावे पुढे आली.

शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या या राजकीय चालीला प्रत्युत्तर देत भाजपनेही कोल्हापूरचेच धनंजय महाडिक यांना िरगणात उतरवले आहे. यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेचा मुकाबला हा प्रामुख्याने संजय पवार-धनंजय महाडिक या कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये होणार आहे.

भाजपपुढे आव्हान

* अलीकडेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. त्या वेळीही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यावर जिल्ह्यात आघाडीचा प्रभाव अधोरेखित झाला. भाजपचा पराभव झाला असला तरी मतांची वाढलेली संख्या लक्षणीय होती. विधानसभा निवडणुकीतील पोटनिवडणुकीच्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी भाजपला राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली आहे. महाडिक यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी जोरदार हालचाली चालवल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपचा खासदार व्हावा यासाठी कंबर कसली आहे. शिवाय महाडिक गट सक्रिय झाला असून त्यांच्या समर्थकांची एक फळीही अपक्ष आमदारांच्या संपर्कात राहिली आहे. महाडिक निवडून आले तर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा प्रभाव वाढीस लागण्याची चिन्हे आहेत. यातून ते महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका त्याचबरोबर लोकसभा-विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कडवे आव्हान देऊ शकतात.

* या निवडणुकीत संजय पवार यांच्या बाजूने विजयाचे फासे पडले तर त्याचा फायदा शिवसेनेसह महाविकास आघाडीला होणार आहे. हा संभाव्य अंदाज लक्षात घेऊन जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आघाडीचे आमदार- दोन्ही खासदार यांनी पवार यांच्या पाठीमागे राजकीय ताकद उभी केली आहे.

पाटील-महाडिक संघर्षांची किनार

कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दशके पाटील- महाडिक परिवारातील राजकीय सामना उत्तरोत्तर रंगत चालला आहे. या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यास या गटाचा प्रभाव वाढून महाडिक गटाचे प्रमुख विरोधक सतेज पाटील यांना आव्हान मिळणार आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी या निवडणुकीसाठी आपल्या हालचाली अधिक गतिमान केल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्याविरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ हे घोषवाक्य घेऊन वातावरणनिर्मिती केली होती. महाडिक गटाला रोखण्यासाठी शिवसेनेचे संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. यातून पाटील-महाडिक हा जिल्ह्यातील पूर्वापार राजकीय संघर्ष चव्हाटय़ावर आला आहे.