सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कारभारावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘विठ्ठल’ कारखान्यात सुमारे ३५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा थेट आरोप करत, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचा इशारा जिल्हा दूधसंघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिला.
“तुम्ही दूध संघाची चौकशी लावा, आम्ही विठ्ठल कारखान्याची लावतो,” असे थेट आव्हान शिंदे यांनी कारखान्याचे अध्यक्ष तथा माढाचे आमदार अभिजीत पाटील यांना दिले. तर दुसरीकडे, “कारखान्याचे सर्व दप्तर नियम आणि कायद्याच्या चौकटीत असून आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास व समोरासमोर चर्चेला तयार आहोत,” असे प्रत्युत्तर आमदार पाटील यांनी दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा व पंढरपूर तालुक्यांतील हा राजकीय संघर्ष आता कमालीचा तापला आहे.
जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. त्यापूर्वी चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेत घेऊन दूधसंघाच्या प्रगतीचा आढावा मांडला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत तुमच्या बँकेला दिलेले कर्ज, दूधसंघाच्या कार्यपद्धतीवर आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत विचारले असता, दूध संघाने परस्पर कोणतीही जागा विकलेली नाही, असा दावा करत चेअरमन शिंदे म्हणाले, “ज्या जागेची विक्री झाली, ती पंढरपूर दूध संघाची असून ती राज्य शासनाच्या नियमांनुसार आणि रीतसर परवानगी घेऊनच विकण्यात आली आहे. याशिवाय टेंभुर्णी व नवी मुंबई येथील जागा दूध संघाने विकलेल्या नसून, संबंधित बँकेच्या कर्जवसुली कारवाईतून त्यांची विक्री झाली आहे. या कारवाईविरोधात दूध संघाने ‘डीआरटी’ (कर्ज वसुली न्यायाधिकरण) न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयीन लढा सुरू आहे.” स्वतःच्या कारखान्यातील संशयास्पद कारभारावरून लक्ष विचलित करण्यासाठीच आमदार पाटील दूध संघावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला लगावत, “दुसऱ्यांची मापे काढण्यापूर्वी स्वतःच्या कारभाराकडे पाहावे,” असे शिंदे म्हणाले.
विठ्ठल कारखान्यातील ३५० कोटींच्या कथित गैरव्यवहाराबाबतचे ठोस पुरावे लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्यांचा एकही पेट्रोल पंप नाही, त्यांच्या नावाने एक ते दीड कोटींचे इंधन खर्चाची बिलं काढली आहेत. तसेच, कामगारांच्या वेतनासाठी दाखविलेले पैशांची परस्परच विल्हेवाट वाट लावली आहे. सभासदांच्या पैशांचा विनियोग चुकीच्या पद्धतीने करून पैसे हडप केला आहे, त्याची सखोल चौकशी स्वतंत्र झाली पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले.
दप्तर घेऊन समोरासमोर चर्चेला तयार : आमदार अभिजीत पाटील
रणजितसिंह शिंदे यांच्या आरोपांना आणि चौकशीच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले, “कारखान्याच्या चौकशीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. कारखान्याचे सगळे दप्तर नियम आणि कायद्याच्या चौकटीत आहे. शिंदे यांनी आरोप करण्यापेक्षा दप्तर घेऊन समोरासमोर चर्चेला यावे, मी तयार आहे. कारखान्यासाठी कर्ज घेतले ही वस्तुस्थिती असली, तरी त्याचा सविस्तर हिशेब साखर आयुक्तांना सादर केलेला आहे. त्याच कर्जातून बंद पडलेला कारखाना पुन्हा सुरू केला आणि गाळप क्षमताही वाढवली, हे वास्तव नाकारता येणार नाही.”
दूध संघाच्या कामगिरीवरून शिंदे यांच्यावर पलटवार करताना पाटील म्हणाले, “दूध संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी किती दूध संकलन वाढवले आणि किती उपपदार्थांची निर्मिती केली? दूध संघाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी जनतेसमोर मांडावा. संघावरील कर्ज त्यांना फेडता न आल्यामुळेच मोक्याच्या जागा कवडीमोल दराने विकल्या गेल्या. त्यांना संस्थेच्या जागा वाचवता आल्या नाहीत आणि दूध संकलनही बंद पडले; हेच काय यांचे चेअरमन म्हणून कर्तृत्व ? आमच्या कारखान्याच्या कर्जाचा हिशेब मागणाऱ्यांनी स्वतःच्या कारखान्यावर किती कर्ज आहे, तेही जाहीर करावे. सहकारी साखर कारखाना मल्टिस्टेट करून शेतकरी सभासदांच्या हक्कांवर गदा आणली आणि ‘ईडी’च्या कारवाईच्या भीतीनेच पक्षांतर केले, हे सर्वसामान्य जनतेला चांगले ठाऊक आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
