कोल्हापूर : शहरातील मोरेवाडी येथील अष्टविनायक कॉलनी येथे एका घरात साप आल्याची माहिती छत्रपती वाईल्ड फाउंडेशनचे अमित चितारे आणि रवी चोपडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता तेथे एक बिनविषारी साप आढळून आला. त्यानुसार त्यांनी संस्थेचे वन्यजीव अभ्यासक आशुतोष सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला.

हा साप येलो स्पॉटेड वूल्फ स्नेक म्हणजेच पिवळ्या ठिपके वाला कवड्या जातीचा साप आहे. तसेच हा साप दुर्मिळ आहे. हा साप फार कमी प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रामध्ये हा साप पुणे, नाशिक, सांगली, बुलढाणा आणि गुजरातमधील काही भाग या ठिकाणी सापडल्याच्या काही शोधनिबंधातील नोंदी आहेत. तसेच हा साप विषारी मन्यार प्रमाणे दिसत असल्याकारणाने या सापाला मारले जाते. त्यामुळे या सापांची संख्या फार कमी राहिली आहे. या सापाचे मुख्य खाद्य पाली, लहान साप, सुरळी इत्यादी आहे. या सापाचे अस्तित्व सध्या धोक्यात आहे. तसेच आता पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात साप बाहेर पडत आहे. यामुळेच गेल्या काही दिवसात आमच्या संस्थेकडून अशाच दुर्मिळ सापांची नोंद झाली आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अजूनही अशा दुर्मिळ गोष्टी कोल्हापुरात पहावयास मिळत आहेत आणि त्यांचे जतन आणि संवर्धन होण्याची गरज सध्या खूप आहे, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक आशुतोष सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा – कोल्हापूरमध्ये आढळला ‘पांढरा चिकटा’; डॉ. मकरंद ऐतवडे यांचे संशोधन

हेही वाचा – कृष्णा खोऱ्यातील महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करू; अलमट्टी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही

हा साप करवीर वनविभागाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती वाईल्ड फाउंडेशनचे सर्पमित्र ओमकार काटकर यांनी सुरक्षितरीत्या पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.