ऊस उत्पादक, साखर कारखानदार, कामगारांकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

राज्यातील या वर्षीचा ऊस गळीत हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार व ऊस तोडणी कामगार-वाहतूकदार अशा सर्वच घटकांनी स्वागत केले आहे. साखर कारखानदारांनी दिवाळीनंतर लगेचच उसाची मोळी टाकून साखर उत्पादन करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

यंदाचा ऊस गळीत हंगाम १ डिसेंबर रोजी सुरू होणार होता. त्याला राज्यातील विविध संघटनांनी विरोध केला होता. त्याची दखल घेत आज मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बठकीत २५ दिवस अगोदरच म्हणजे ५ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे साखर उद्योगातील सर्वच घटक देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यासाठी पुढे आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी म्हणाले, मूठभर लोकांच्या सल्ल्याने घेतलेला चुकीचा निर्णय संघटनेच्या प्रयत्नामुळे बदलला आहे. त्यासाठी मंत्री समितीची बठक इतिहासात पहिल्यांदाच झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष, जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शासनाने योग्य निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. कर्नाटकातील साखर कारखाने सुरू होत असताना पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला असून मोठी अडचण दूर झाली आहे.  ऊसतोडणी कामगार-वाहतूकदार संघटनेचे नेते कॉ. प्रा. सुभाष जाधव यांनी राज्यातील कारखाने उशिरा सुरू झाले असते तर त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार व ऊसतोडणी कामगार-वाहतूकदार अशा सर्वच घटकांना बसला असता. शासनाच्या अधिक सयुक्तिक निर्णयाने सर्वच घटकांचा लाभ होईल.

कारखान्यांना दिलासा

सोलापूर – ऊस गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या निर्णयाचे सोलापूर जिल्ह्य़ात सर्व साखर कारखानदारांकडून स्वागत होत आहे. या निर्णयामुळे नव्या ऊस लागवडीसाठी होणारी ऊसतोड थांबून हा ऊस साखर कारखानदारांना उपलब्ध होणार आहे.  देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात मागील सलग दोन वर्षांच्या दुष्काळाचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात केवळ ६४ हजार हेक्टर क्षेत्रातच उसाचे पीक असताना त्यात पुन्हा आगामी पीक हंगामात लागवडीसाठी उसाचे बेणे लागणार आहे. त्याचा विचार करता यंदाच्या गळीत हंगामात उसाची टंचाई मोठय़ा प्रमाणात भेडसावणार आहे. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या गळीत हंगामास उशीर झाला असता तर साखर कारखान्याना ऊसच मिळाला नसता.  सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात प्रति हेक्टरी शंभर टनाप्रमाणे ६४ हजार हेक्टर क्षेत्रात मिळून सरासरी ६४ लाख टन एवढा ऊस उपलब्ध होणे अपेक्षित असले, तरी आगामी काळात लागवडीसाठी मोठय़ा प्रमाणात उसाचे बेणे लागणार आहे. जर गळीत हंगामास उशीर झाला असता, तर या नव्या लागवडींसाठीच मोठय़ा प्रमाणात ऊस तुटला असता.