कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या दूधगंगा नदीवरील पाणी योजना करिता पाण्याच्या उपलब्धतेबाबत नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक समितीच्या काही बैठका झाल्या असून, तांत्रिक अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल अंतिम करणेकरिता मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, व मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे समितीने सादर केलेला आहे. त्यांचेकडून हा अहवाल तातडीने उपलब्ध करून घेत आहोत. अहवाल मिळताच तांत्रिक समिती तसेच दूधगंगा योजना संबंधी दोन्ही कृती समितीच्या प्रत्येकी एक सदस्य यांची तात्काळ बैठक घेऊन अहवाल शासनास सादर करीत असून शासन अंतिम निर्णय देईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी इचलकरंजी महापालिकेच्या दूधगंगा नळ पाणी प्रश्नी चर्चा केली होती. कागल तालुक्यातील सुळकुड गावाहून इचलकरंजीला येणाऱ्या पाणी योजनेसाठी राज्य शासनाने अभ्यास समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यात देणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही तो दिला गेला नसल्याने राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. तर या प्रश्नावर जिल्हाधिकारी सकारात्मक असल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-कोल्हापुरातील शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची शक्ती एकवटली; महामार्ग हटावच्या घोषणांनी परिसर दणाणला

आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी महानगर अध्यक्ष, पाणीपुरवठा माजी सभापती विठ्ठल चोपडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दूधगंगा योजनेच्या तांत्रिक समितीचा अहवाल एक महिन्याच्या आत शासनाकडे पाठवणे आवश्यक होते. तो तातडीने शासनाकडे तातडीने पाठवावा जावा. यावेळी औद्योगिक आघाडी राज्य प्रमुख सुभाष मालपाणी, औद्योगिक आघाडी अध्यक्ष अशोक पाटणी, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सलीम धालाईत, वैद्यकीय मदत सेल आघाडी अध्यक्ष राजू आरगे, कार्याध्यक्ष अमित गाताडे, सूर्यकांत कडुलकर उपस्थित होते.