विधानपरिषद उमेदवारीबाबत कोल्हापूर जिल्हय़ाच्या पश्चिम भागात रंगणाऱ्या उमेदवारीचा केंदिबदू प्रथमच पूर्व भागाकडे सरकला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी केलेली चर्चा निवडणुकीबाबत असल्याच्या चच्रेने वेग घेतला आहे. तर काँग्रेसमध्ये इच्छुक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी प्रमुख विरोधकांशी चर्चा केली असता त्यांनी पाठीशी राहण्याचा शब्द दिला आहे. पालकमंत्र्यांपाठोपाठ आवाडे यांनीही यड्रावकर तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांची आज भेट घेऊन पाठिंब्याची मागणी केली. यड्रावकर यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा करण्याचे नियोजन केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था गटातून निवडून द्यायच्या कोल्हापूर जिल्हय़ातील एका जागेच्या उमेदवारीवरून जिल्हय़ाचे राजकारण ढवळून निघाले आहे. गेल्या काही दशकांमध्ये विधानपरिषदेची उमेदवारी कोल्हापूर शहरात राहिली आहे. तुलनेने पूर्वेकडील भागाला फारसे प्रतिनिधित्व दिले गेले नाही. ३७० मतांपकी सुमारे १६० मतदार हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांमध्ये एकवटलेले आहे. या दोन तालुक्यांतील राजकीय वातावरण परस्परांना पूरक असे राहिले आहे. यामुळे या दोन तालुक्यांतील मतदार, कार्यकत्रे यांनी पूर्व भागाला उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला आहे. त्यातूनच आवाडे व यड्रावकर यांची उमेदवारी पुढे येत आहे.
आवाडे यांनी गेल्या पंधरवडय़ापासून उमेदवारीकरिता जोर लावला असून, मुंबई-नवी दिल्ली येथील वरिष्ठांशी भेटी घेऊन आपल्या उमेदवारीचे महत्त्व पटवून दिले आहे. त्याचबरोबर मतांची जुळणी करण्यासाठी विरोधकांनाही सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापूर महापालिकेनंतर इचलकरंजी नगरपालिकेत सर्वाधिक ६२ मते आहेत. येथील प्रमुख विरोधक असलेल्या शहर विकास आघाडीने नगरीच्या विकासाचे कारण दाखवत आवाडे यांना पाठिंबा देऊ केला असल्याने ती आवाडे यांची भक्कम बाजू बनली आहे. नवी दिल्लीतील तीन दिवसांच्या राजकीय भेटी संपवून शुक्रवारी इचलकरंजीत दाखल झाल्यानंतर आवाडे यांनी विरोधकांशी संपर्क साधला. आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अशोक जांभळे, अजित जाधव, सागर चाळके, सुनील महाजन, रवींद्र माने यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असता त्यांनी आपला पािठबा कायम असल्याचे आवाडे यांना सांगितले. आवाडे यांना उमेदवारी न मिळाल्यास पर्यायी सोय म्हणून विरोधकांनी महाजन यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी आणून ठेवला. याशिवाय आवाडे यांनी कोरे, यड्रावकर या दोन तालुक्यांत राजकीय वजन असलेल्या नेत्यांची भेट घेऊन पािठबा देण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे निमंत्रक, प्रदेश सरचिटणीस यड्रावकर यांची जयसिंगपूर निवासस्थानी भेट घेतली. शिरोळ तालुक्यातील मते, भाजपची मते, आणखी एका महागटाची मते  आणि राष्ट्रवादीतून मिळणारी मते याच्या आधारे यड्रावकर विधानपरिषदेचा फड मारू शकतात, असा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येते. यड्रावकर यांच्यापासून आमदारकीचा गुलाल चार वेळा हुकला असून यानिमित्ताने ती संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गटाने राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्याशी चच्रेचे नियोजन केले आहे. या साऱ्या घडामोडी पाहता विधानपरिषदेच्या निवडणुकीत पूर्वेकडील दोन तालुक्यांचे राजकीय महत्त्व वाढीस लागले असून, या घटना निर्णायक ठरत आहेत.