कोल्हापूर : करोना टाळेबंदीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यत कडक संचारबंदी लागू झाली आहे. रविवारी याचा पहिला दिवस असल्याने असताना त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाई केली जात होती.

जिल्ह्यतील करोना स्थिती गंभीर बनल्याने पुढील आठवडाभर कडक टाळेबंदी लागू करण्याला शनिवारी मध्यरात्री सुरुवात झाली. रविवारी सकाळपासूनच टाळेबंदीला प्रतिसाद मिळत असल्याचा प्रत्यय आला. शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. व्यापार, औद्योगिक आस्थापने बंद असल्यामुळे हालचाली थंडावल्या होत्या. रस्त्यावर पूर्णत शुकशुकाट दिसत होता.

कारवाईचे सत्र 

जिल्ह्यत कडक संचारबंदी लागू झाली आहे हे माहीत असतनाही काही महाभाग  फिरण्यासाठी, व्यायामासाठी बाहेर पडले होते. अशांना दिवस उजाडताच पोलिसांनी ताब्यात घेतले. कारण नसतानाही फिरणारे वाहनचालक, लोकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. काही ठिकाणी अशांना लाठीचा प्रसाद दिला. याची छायाचित्रे समाज माध्यमात अग्रेषित होऊ लागल्याने लोकांनी बाहेर पडण्याचे टाळले. शहरात दिवसभर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

तौक्ते चक्रीवादळाची साथ

आज दिवसभर तौक्ते चक्रीवादळामुळे पावसाळी वातावरण होते. पावसाची रिपरिप सतत सुरू असल्याने लोकांनी बाहेर पडण्याचे टाळल्याने रस्त्यावरील गर्दीही आपोआप आटोक्यात आली. रविवार सुटीचा दिवस असल्याने लोक फारसे रस्त्यावर आले नाहीत. केवळ वैद्यकीय, दूध अत्यावश्यक सेवा याचीच अत्यल्प वाहतूक रस्त्यावर दिसत होती.

कोल्हापूर जिल्ह्यत कडक संचारबंदीच्या पहिल्या दिवशी विनाकारण बाहेर पडलेल्या वाहनचालक,लोकांवर पोलिसांनी कारवाई केली. (छाया – राज मकानदार)