महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल

केंद्रीय कृषिमंत्रीपदाची धुरा वाहात असताना हमीभावासह शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांचे  हात कोणी बांधले होते का ?, अशी विचारणा करत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्यावर रविवारी येथे निशाणा साधला. शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाते की काय, अशी भीती पवारांना वाटते आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली .

शेतकरी संपाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन मंत्री पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले . हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. तथापि संप लगेचच मिटल्यामुळे काहींची दुकानं दोनच  दिवसांत बंद झाली, असे म्हणत शेतकरी नेत्यांना लक्ष्य केले. तथाकथित नेत्यांना आणि विरोधकांना संप मिटल्याचे दु:ख झाले आहे , अशी टीका त्यांनी केली. संप काळातील दोन  दिवसांत लूट करणारे कोणत्या पक्षाचे हे तपासण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी संप सुरु झाल्यावर पवार शासनावर बेछूट आरोप करत सुटले आहेत, याकडे लक्ष वेधून पाटील म्हणाले , पवारांना  भ्रष्टाचारावर असेच अधूनमधून बोलावेसे वाटते . पण सत्ताकाळात काय केले यावर चर्चा नाही . त्यांच्या कार्यकाळात राज्यातील धरणांची कामे अपूर्ण का राहिली?  धरणे पूर्ण झाली नसल्याने  कालव्यांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.

आमची बांधीलकी शेतकऱ्यांविषयी आहे. गेल्या पंधरा वर्षांत करता आले नाही ते गेल्या अडीच वर्षांपासून करण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे शासनाने केले आहे.

शासन कालही शेतकऱ्यांच्या मागे होते आणि भविष्यातही राहिल. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे , असा उल्लेख करून  पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांना सुख देण्याची भूमिका म्हणजे, संपात फूट अशी कशी होऊ शकते, अशी विचारणा त्यांनी केली.

स्वामिनाथन दाक्षिणात्य अभिनेते

शतकऱ्यांकडून स्वामिनाथन समितीच्या अंमलबजावणीचा आग्रह केला जात असल्याकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले. त्यावर पाटील यांनी स्वामिनाथन हे दाक्षिणात्य अभिनेते असल्याची गमतीवजा खिल्ली उडवली.