सोलापूर : “रोहित पवार यांना बालपणी दुपट्यातच समज आली असून ते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना आंदोलन, मोर्चे आणि उपोषणे काय असतात याची जराही माहिती नाही. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी प्रत्येक विषयावर उठून काहीतरी बडबड करायची आणि स्टंटबाजी करायची हीच त्यांची सवय आहे,,” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत सोलापूर विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर थेट टिका केली आहे. “कोणता विषय कशा पद्धतीने हाताळायचा याचं त्यांना साधं ज्ञान नसून, बार्शी आणि मराठवाड्याच्या दुष्काळी स्थितीला रोहित पवार आणि त्यांचे पूर्वजच जबाबदार आहेत,” असा थेट आरोपही राऊत यांनी यावेळी केला,.
आमदार पवार यांच्याकडून दुष्काळाच्या प्रश्नावरून राज्यशासनावर करण्यात येत असल्याच्या आरोपांबाबत आमदार राऊत माध्यमांशी बोलत होते.

‘दुष्काळात सरकार बांधावर, विरोधकांकडून मात्र दिशाभूल’

राज्यात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी स्थितीची राज्य सरकारने वेळेत दखल घेतली आहे. निकष बाजूला ठेवत शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार व सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि आमदार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेत असताना, विरोधक मात्र केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी स्फोटक विधाने करत असल्याचा आरोप आमदार राऊत यांनी केला.

पाणी प्रश्नावरून थेट पवारांवर टिकास्त्र…

सिंचन प्रकल्पांचा दाखला देत आमदार राऊत म्हणाले, “१९९६ ची बार्शी उपसा सिंचन योजना आजतागायत रखडवून कुणी ठेवली? तुमच्याच आजोबांच्या काळातील ही योजना वेळेत पूर्ण झाली असती, तर तालुक्यातील जनतेलार ही दुष्काळाची वेळ आली नसती. गेली २५ वर्षे कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची केवळ चर्चाच सुरू ठेवून मराठवाड्याला आणि बार्शीला झुलवत ठेवले गेले. एवढी वर्षे सत्तेत असताना या भागाला पाण्यापासून वंचित का ठेवले? आज दुष्काळाचे चटके बसत असताना उलट ओरड सुरू आहे; हा निव्वळ ‘चोराच्या उलट्या बोंबा’ प्रकार आहे.”

‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना भडकवण्याचा उद्योग…

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलताना आमदार राऊत म्हणाले, “शासनाने विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या बहुतांश मागण्या आधीच मान्य केल्या आहेत. मात्र, सत्तेशिवाय राहू न शकणारी ही मंडळी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफडत असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी तरुणांना भडकवून दिशाहीन करण्याचे काम करत आहेत,. आंदोलनात बसून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा रोहित पवारांनी आधी वस्तुस्थिती समजून घ्यावी. विद्यार्थ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये; त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यास तयार आहोत,” असे आवाहन आमदार राऊत यांनी केले.