कोल्हापूर : एकनाथ शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचे येथे दुसऱ्याही दिवशी पडसाद उमटले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी गायकवाड यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळासह राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाली की, संजय गायकवाड यांनी केलेले कृत्य हे दखलपात्र गुन्ह्यांतर्गत येते. अशा प्रकरणात कायदेशीर अभिप्राय घेण्याची गरज नसते, तर थेट गुन्हा नोंदवणे अपेक्षित आहे. आम्हाला पोलिसांबद्दल आदर आहे, मात्र कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन

यावेळी रोहित पवार यांच्यासोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, सतीचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, सीमा पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, पदाधिकारी उपस्थित होते. संजय गायकवाड यांची विधाने नेहमीच वादग्रस्त आणि महिलांचा अवमान करणारी असतात. आता त्यांनी थेट धमकावण्यापर्यंत मजल मारली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पाठपुरावा सोडू देणार नाही, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. या मागणीचे निवेदन राजारामपुरी पोलिसांना देण्यात आले असून, पोलीस यावर आता काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशांत आंबी यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तुर्तास आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्यावर तातडीने गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला.

आंबी यांनी तक्रार अर्जात संजय गायकवाड यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, हेदेखील नमूद केले आहे. संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम ३५१,३५२,३५६ कलम १९२ व मानवी हक्क संरक्षण कायदा  आणि इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी पोलिसांकडे संजय गायकवाड यांच्याविरोधात रितसर आणि सविस्तर तक्रार देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मी पोलिसांनी तक्रार दिली असून त्यामध्ये कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, तेदेखील नमूद केले आहे. पोलिसांनी मला तक्रार मिळाल्याची पोचपावती दिली असून गुन्हा दाखल होणार की नाही, याबाबत दोन दिवसांत माहिती देऊ असे सांगितल्याची माहिती प्रशांत आंबी यांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, आम्हाला आमच्या कायदेशीर पथकाशी चर्चा करावी लागेल.