सोलापूर : विठूनामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या तालावर मजल-दरमजल करीत विदर्भातील कौंडिण्यपूर येथून निघालेला श्री रुक्मिणीमातेचा पालखी सोहळा गुरुवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रमुख दहा मानाच्या पालख्यांपैकी जिल्ह्यात प्रवेश केलेला हा पहिलाच पालखी सोहळा आहे. धाराशिव जिल्ह्यातून हा सोहळा बार्शी तालुक्यातील पाथरी येथे दाखल झाल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या वतीने त्याचे भव्य स्वागत करण्यात आले.
मराठवाड्याची सीमा ओलांडून पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. शिराळेपाटी (ता. बार्शी) येथे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, मंडल अधिकारी राजेंद्र मुंढे आदी प्रशासकीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी सोलापूरकरांच्या वतीने पालखीचे स्वागत केले. या सोहळ्याचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम पाथरी (ता. बार्शी) येथे असून, शुक्रवारी (दि. १८) हा पालखी सोहळा बार्शी शहरात दाखल होईल.
बार्शी तालुक्यात ‘वरुणराजा’चे आगमन
रुक्मिणीमातेचा पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होताच बार्शी तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. जवळपास दीड तास चाललेल्या या जोरदार पावसामुळे परिसरातील शेत-शिवार चिंब झाले. चालू हंगामातील हा पहिलाच मोठा पाऊस असल्याने दुष्काळी छायेतील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘रुक्मिणीमाता पाऊस घेऊनच आली’ अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी माऊलींचा जयजयकार केला. पाथरी आणि परिसरातील ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या निवास, भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठी लगबग सुरू केली होती.
संत गजानन महाराजांचा पालखी आज जिल्ह्यात येणार
शेगाव (बुलढाणा) येथून निघालेली संत श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. १७) सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. सायंकाळी ६ वाजता तुळजापूर (धाराशिव) येथून पालखी सोहळा उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोलापूर जिल्ह्यात दाखल होईल. प्रशासनतर्फे पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
