कोल्हापुरात झालेल्या ऊसदर बठकीतील तोडगा फेटाळणाऱ्या सकल ऊस उत्पादक संघटनेने सकल ऊसकरी परिषद घेतली. खासदार राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेल्या शिरोळ या तालुक्याच्या ठिकाणी ही परिषद घेण्यात आली. उसाला एकरकमी प्रतिटन ३ हजार ३०० रुपये दर देण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. याच मागणीसाठी उद्या सोमवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
ऊसदराचा तोडगा काढण्यासाठी कोल्हापुरात साखर कारखानदार व शेतकऱ्यांच्या ५ संघटना यांच्या समवेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन बठका घेतल्या. अखेरच्या बठकीत एफआरपीसह १७५ रुपये जादा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. पण शिरोळ तालुक्यात नव्याने उदयास आलेल्या सकल ऊस उत्पादक संघटनेने हा प्रस्ताव फेटाळतानाच राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. पुढचे पाऊल म्हणून शेट्टी यांची कर्मभूमी असलेल्या शिरोळ येथील शिवाजी चौकात पहिली सकल ऊस उत्पादक परिषद घेण्यात आली. उसाला प्रतिटन विनाकपात एकरकमी ३ हजार ३०० रुपये दर द्यावा. एफआरपीसह १७५ रुपये पंधरा दिवसांत ऊस उत्पादकांना द्यावेत, अशा मागणीचा ठराव परिषदेत करण्यात आला. विश्वास काळे, बंटी देसाई, सुभाष निकम, अमित दळवी, विकास पाटील यांची भाषणे झाली.
पुन्हा मंत्र्यांच्या घरांवर मोर्चे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तत्कालीन मंत्र्यांच्या घरांवर मोच्रे काढून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. आता शेट्टी सत्तेत सहभागी झाले असून त्याऐवजी सकल ऊस उत्पादक संघटनेने मंत्र्यांच्या घरांवर मोच्रे काढण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या परिषदेत मोर्चाचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सोमवारी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरावर मोर्चा आहे. त्यांच्याकडून योग्य निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नाही. पंधरा दिवसांत एफआरपी व १७५ रुपये मिळाले नाहीत तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार राजू शेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला.
पत्र्याच्या घरात साडेतीन लाखाचे कुत्रे
सदाभाऊ खोत यांच्यावर हर्षल बागल यांनी टीकेची झोड उठवली. निवडणुकीच्या काळात सदाभाऊ खोत माझे साधे पत्र्याचे घर आहे, मी गरीब उमेदवार आहे, असे सांगून मताचा जोगवा मागायचे. पण पराभूत खोत यांचे घर मंत्रिपद आल्यावर दोन कोटीचे असून दारातील कुत्रे साडेतीन लाखाचे आहे. शेतकऱ्याचा आक्रोश मांडणाऱ्यांना हे गणित कसे जमते, अशी टिप्पणी केल्यावर एकच हंशा पिकला.
