शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. राज्य शासन कर्जमाफी देण्यासाठी विचारमंथन करत आहे, पण कर्जमाफीच्या नावाने संघर्ष यात्रा काढणाऱ्यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात या विषयाचा उल्लेख का केला नाही. आपल्या सत्ताकाळात पाप झाकण्यासाठी संघर्ष यात्रा काढली आहे. सत्ताकाळात पाप करणाऱ्यांनी आता काशीयात्रेला जाऊन स्नान करून एकदाचे पवित्र व्हावे, अशा शब्दांत कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी विरोधकांचा समाचार घेतला.
एका स्थानिक कार्यक्रमासाठी खोत आज येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संघर्ष यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात आली असताना खोत यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता. आज खोत यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.




ते म्हणाले, विरोधकांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कळवळा अधिकच आला आहे. २० वर्षांपूर्वी यांनी कर्जमुक्ती केली मग यांचेच राज्य असताना शेतकरी कर्जात कसा बुडाला हे त्यांनी सांगावे. उसाला हमीभाव मागत असणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर यांनीच गुन्हे दाखल केले. मावळ भागात यांनीच शेतकऱ्यांवर गोळय़ा झाडल्या. या उलट आत्ताचे सरकार सत्तेत आल्यापासून साधी अश्रुधुराची नळकांडीही शेतकऱ्यांना हटवण्यासाठी चालवली नाही. हा दोन्ही सरकारमधील फरक आहे.
विद्यमान सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी यासाठी प्रयत्नशील असून, माझेही या दिशेने काम सुरू आहे, असा उल्लेख करून खोत म्हणाले, शेतकरी सक्षम होण्याला शासन महत्त्व देत आहे. त्याला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा, विपणन व्यवस्था, पीक नियोजन याद्वारे सक्षम बनवले पाहिजे. त्यासाठी सरकार काम करत आहे. या बाबी त्याला मिळाल्या नाहीत तर तो पुन:पुन्हा कर्जातच बुडून जाणार आहे.