सदाभाऊंपुढे आव्हान उक्ती आणि कृतीचे!

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राला शेतकरी संघटनांचे अस्तित्व उल्लेखनीय मानले जाते.

raju shetty, sadabhau khot,
शेट्टी विरुद्ध खोत असा संघर्ष राजकीय मळ्यात रंगणार आहे.

शेतकरी संघटनांचे वावर उदंड झाले असताना त्यात आता कृषी राज्यमंत्री असलेले सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची भर पडली आहे.  एखाद्या मंत्र्याने संघटना स्थापन करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याने तो कितपत तडीस जाणार याची उत्सुकता आहे. उक्ती – कृतीचा मेळ  किती उत्तम प्रकारे बसतो यावर संघटनेचे यश अवलंबून असणार आहे. मुख्य म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात संघटनेची घोषणा करतानाच खोत यांनी शेट्टी यांना नामोहरण करण्याचा इरादा व्यक्त केल्याने यापुढे शेट्टी विरुद्ध खोत असा संघर्ष राजकीय मळ्यात रंगणार आहे. यात कोण कोणावर कशी  मात करतो याला आगामी  काळात महत्व प्राप्त होणार आहे.

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राला शेतकरी संघटनांचे अस्तित्व उल्लेखनीय मानले जाते. शेतीचे शास्त्रीय भाषेत अर्थशास्त्र उलघडून दाखवून शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे बीजारोपण केले. त्यांची संघटना राज्यातच नव्हे तर देशात चच्रेचा विषय बनली. पुढे या संघटनेची राजकीय बैठक कोणती यावरून वाद झाला. आणि शेतकरी संघटनांच्या वेगवेगळ्या चुली पेटू लागल्या.  पाचगणी येथे पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी संघटनेच्या सभेत शरद जोशी यांनी भाजपला पािठबा दिल्याने राजू  शेट्टी यांनी कोल्हापुरात स्वतंत्र संघटनेची स्थापना केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना हे नाव देऊन जोमाने काम केल्याने कोल्हापूर जिल्ह्यत या संघटनेला बाळसे आले. त्यांचा राजकीय प्रवासही शिवार  ते संसद असा झाला. तर , रघुनाथदादा पाटील यांनी वेगळी संघटना चालवली. शरद जोशींच्या पश्च्यात त्यांच्या अनुयायांनी शेतकरी  संघटना प्रवाही ठेवली. खेरीज, राज्यभर अनेक शेतकरी संघटनांचे पेव फुटले. यात सर्वात प्रभावी संघटना ठरली ती  राजू  शेट्टी यांची. स्वाभिमानी शेतकरी संघटना. अर्थात हि संघटना वाढण्यास शेट्टी यांना मोठे योगदान दिले ते सदाभाऊ खोत यांनी.

मत्री आणि शत्रुत्व

शेट्टी यांनी आपल्याप्रमाणे खोत यांनीही दिल्ली सर करावी असे स्वप्न पाहिले .  माढ्यात खासदारकीच्या निवडणुकीत  पराभव झाल्यावर खोत नाराज झाले . पुढे ते  भाजपच्या कोट्यातून आमदार , मंत्री झाले . याला शेट्टी यांचे सहकार्य महत्वपूर्ण होते . पण हाच प्रवास दोघा  मित्रात दुरावा   निर्माण करण्यास कारणीभूत ठरला . मंत्री झाल्यानंतर सदाभाऊंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढविली खरी;  पण  संघटनेचे कार्यकत्रे दुरावले गेले . त्याच्या तक्रारी वाढल्या .  परिणाम म्हणून  संघटनेतून सदाभाऊंची  हकालपट्टी झाली . हा घाव खोत यांच्या वर्मी लागला . दुखावलेल्या खोत यांनी जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा पवित्रा  घेत आपली स्वतची  रयत क्रांती संघटना  स्थापन केली . त्यांच्या संघटनेत शेतकरी हा शब्द नसला तरी ती शेतकरयांच्या कल्याणासाठी  कार्यरत राहणार असल्याची घोषणा केली आहे . या माध्यमातून खोत यांनी शेट्टी यांना राजकीय आव्हान दिले आहे . शेट्टी यांची दिल्लीला जाणारी वाट अडवून गल्लीतच रोखून धरण्याचा कार्यक्रम खोत यांनी हाती घेतला आहे . त्यामुळे  यंदाच्या दसरयाला  एकेकाळचे मित्र एकमेकांच्या छाताडावर बसून परस्परांना  नामोहरण करण्यासाठी शस्त्र  पूजा करण्यात दंग  होतील . राजकारण हा  आपल्या संघटनेचा  िपड नसेल असेल असे खोत जाहीरपणे बोलत असले तरी त्यांच्या डोळ्यातील अंगार त्यांना काय करायचे आहे , हे सांगण्यास पुरेसा आहे. शिवाय त्यासाठी त्यांना भाजपाची आणि सत्तेची सोबत मिळणार आहे .

करून दाखवावे – योगेश पांडे

राज्यात अनेक शेतकरी संघटना असताना त्यात खोत यांच्या आणखी एकाची भर पडली; तिचे स्वागत करतो, असे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे म्हणाले.  सत्तापदी राहणारया खोत यांनी शेतकरयांचे अनंत  प्रश्न सोडवून दाखवावे. उक्ती आणि कृतीचा मेल त्यांनी घालावा. सोबतच, कालपर्यंत सामान्य शेतकरी असणारे खोत यांनी शेतीतून वैभव कसे मिळवले याचे रहस्यही  त्यांनी सामान्य शेतकरयांना उलगडून दाखवावे. शेतकरी कर्जमुक्ती , यंदाचा ऊस दर  , शेती मालाला हमी भाव आदी प्रश्न त्यांनी सोडवूनच दाखवावेत.  मी एकटा राज्यमंत्री काय करणार अशा सबबी त्यांनी पुढे करू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नवी बनावटगिरी – शेतकरी संघटना

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष व खोत यांच्या सांगली जिल्ह्यतील शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकत्रे संजय कोले यांनी शेतकरी संघानेही आणखी एक बनावट आवृत्ती बाजारात आणल्याचे सांगत खोत यांच्यापासून शेट्टी, रघुनाथदादा यांचा  समाचार घेतला . शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या नावाशी नाते  सांगणारे शेट्टी, रघुनाथदादा यांनी शेतकरयांचे कसलेही कल्याण केले नाही. आता खोत काय प्रकाश पाडणार, असा प्रश्न करून   फुटीचे  बीजातुन  फुटीचेच धान्य उगवेल, अशी टीका केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sadabhau khot launches rayat kranti sanghatana

Next Story
नगररचना संचालकांना लाच स्वीकारताना अटक
ताज्या बातम्या