सातारा: घरची बेताची आर्थिक स्थिती, वडलांची नोकरी गेलेली, बहिणीची जबाबदारी अशा पार्श्वभूमीवर त्याने तिरंदाजीचे स्वप्न उराशी बाळगले. अखंड सराव, मेहनत घेण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर त्याच्या या जिद्दीपुढे आर्थिक पाठबळाचे संकट उभे ठाकले. अशावेळी मुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी अखेर त्याच्या आईने स्वत:चे दागिने विकले आणि तिरंदाजीसाठी आवश्यक सराव-साहित्य खरेदी केले. या साऱ्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या या ‘अर्जुना’ने जपानमध्ये सुरू असलेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला एक नाही तर तब्बल दोन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. ही गौरवगाथा आहे सातारा जिल्ह्यातील करंडी गावातील साहिल जाधव याची. त्याच्या या यशाचे आज देशभर कौतुक होत आहे.

साहिल हा सातारा जिल्ह्यातील करंडी नावाच्या छोट्याशा गावातील खेळाडू. त्याला सुरुवातीपासूनच तिरंदाजी खेळाची आवड होती. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्याच्या या खेळाला उत्तेजन मिळाले. त्याचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाले. तर साताऱ्यातीलच वाय. सी. कॉलेजमधून एम.एस्सी. पूर्ण करत त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षणाच्या या टप्प्यावरच साहिल तिरंदाजीकडे वळला. मात्र घरच्या सामान्य परिस्थितीमुळे या खेळात पुढे प्रवास करणे त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरले होते.

एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या साहिलचे वडील राजेश जाधव हे एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. मात्र साहिलचे शिक्षण सुरू असतानाच त्यांची ही नोकरी गेली. आई सीमा जाधव शिक्षिका म्हणून नोकरी करतात. त्यांच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. साहिलसोबतच एक बहिण सानिका हिचेही शिक्षण सुरू. अशा परिस्थितीत तिरंदाजीसारख्या महागड्या खेळाचे स्वप्न पाहणेही साहिलसाठी अवघड होते. या खेळासाठी लागणारा सराव, मार्गदर्शन, महागडी साधने यासाठी खूप मोठा खर्च करावा लागणार होता. मात्र मुलाची आवड आणि जिद्द पाहून या कुटुंबाने आर्थिक चटके सहन करत साहिलच्या या खेळाला पाठिंबा दिला. प्रसंगी त्याच्या आईने स्वत:चे दागिने विकले मात्र त्याच्या या खेळाचा प्रवास निरंतर सुरू राहील याची काळजी घेतली.

कुटुंबाच्या या पाठिंब्याच्या जोरावर साहिलने देखील अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिरंदाजीतील हा प्रवास सतत यशाची कमान उंचावत सुरू केला. २०१६ मध्ये साहिलने व्यावसायिक स्पर्धेसाठी सराव सुरू केला. ‘दृष्टी आर्चरी अकादमी’तून त्याने प्रशिक्षणाला सुरुवात केली. मात्र, त्याचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. पहिले राष्ट्रीय पदक मिळवण्यासाठी त्याला तब्बल सात वर्षे वाट पाहावी लागली. अनेकदा अगदी थोड्या फरकाने त्याचे हे पदक हुकले, पण त्याने हार मानली नाही. अखेर २०२४ मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्याने पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर २०२५ मध्ये ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’मध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली. २०२६ च्या शांघाय ‘आर्चरी वर्ल्ड कप’मध्ये पुरुषांच्या ‘कंपाउंड इंडिव्हिज्युअल’ प्रकारात कांस्यपदक मिळवून त्याने आपल्या यशाची मालिका कायम ठेवली. यानंतर त्याने यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाऊल ठेवले आणि गेल्या अनेक वर्षांच्या अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एक नाहीतर तब्बल दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याच्या या उत्तुंग यशाची वार्ता कानी पडताच आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गेल्या अनेक वर्षांच्या साहिल आणि त्याच्या कुटुंबीयांच्या या जिद्दीला मोठे यश प्राप्त झाले. त्याच्या या यशाचे आज देशभर कौतुक होत आहे.

साहिल सध्या कोलकाता येथे दक्षिण-पूर्व रेल्वेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. दृष्टी आर्चरीचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनी त्याच्या कौशल्याला पैलू पाडले. नागोयातील या यशानंतर साहिलचे पुढील ध्येय ऑलिम्पिक पदक असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

साहिलला लहान असल्यापासून खेळाची आवड होती. यातच त्याने आपले लक्ष तिरंदाजी खेळावर केंद्रीत केले होते. मात्र, हा खेळ आमच्यासारख्या सामान्य कुटुंबास परवडणारा नव्हता. यासाठी आवश्यक साहित्य, सरावाचा खर्च मोठा आहे. मात्र, आम्ही कुटुंबाने मिळून त्याच्या या खेळाच्या प्रवासात खंड पडू दिला नाही. त्यानेदेखील याची जाणीव ठेवत रात्रंदिवस मेहनत घेत जिद्दीने या खेळात स्वत:ला उंचावत नेले. यातूनच आजचा हा दिवस आपल्याला पाहण्यास मिळत आहे. या यशाने कुटुंबाला आणि आमच्या गावाला खूप आनंद झाला आहे. – सीमा राजेश जाधव