साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येऊनही आनंद यादव यांना अध्यक्षपद न देणे, नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना विरोध दर्शवणे ही सर्व असहिष्णुतेची लक्षणे आहेत. या विरोधामागे समाजातील वैचारिक, सामाजिक, आíथक वर्चस्व प्रस्थापित ठेवण्याचा हेतू आहे, अशी टीका राज्यशात्राचे अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांनी रविवारी येथे केली. महाराष्ट्र सहिष्णु की असहिष्णु या विषयावर येथे दक्षिण महाराष्ट्र सभेच्या वतीने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनातील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
शिवसेना नेते आमदार नीलम गोऱ्हे, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर, प्रकल्पग्रस्त नेते कॉम्रेड संपत देसाई यांनी परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला विनोबा भावे यांनी नकार दिल्यानंतर त्याचे कारण विचारले असता भावे यांनी त्याची चार प्रमुख कारणे सांगितली. मध्ययुगीन इतिहासाचा फुकटचा अभिमान, मराठी लोकांत भिनलेला जातीयवाद, िहसाचाराची आवड व न्यूनगंड हे चार दोष मराठी माणसाने दूर केले नाहीत तर संयुक्त महाराष्ट्र होऊनही दोषांची तीव्रता वाढतच जाईल, अशी कारणमीमांसा भावे यांनी केली होती, असा उल्लेख करून चौसाळकर म्हणाले, त्यांच्या विधानांची खात्री १९६६-६७ साली महाराष्ट्राने अनुभवली. शिवसेना ही पहिली विकृती राज्यात आकाराला आली. िहसा, जातीयवाद, विरोधकांना नष्ट करणे, ही प्रवृत्ती पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रात प्रबळ झाली. कृष्णा देसाई यांचा खून करण्यात आला.  डाव्या शक्ती क्षीण केल्या गेल्या. गेल्या १०-१५ वर्षांत असहिष्णु प्रवृत्ती सबळ होत चालली आहे. जात, वंश, भाषा, इतिहासाची मांडणी यावरून िहसा होत असल्याकडे लक्ष वेधले.
सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या कलाकृती निर्माण करणारे गब्बर झाले. शेतकरी मात्र जमिनीतच रुतल्याकडे लक्ष वेधले. पुरस्कार वापसी करणाऱ्यांनी जनतेशी नाळ जोडून रस्त्यावर उतरण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
नीलम गोऱ्हे यांनी पुरस्कार वापसीच्या प्रवृत्तीवर टीका केली. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आदर केला पाहिजे. पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांनी बिहार निवडणुकीनंतर पुरस्कार परत करण्याचे का थांबवले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  दत्तप्रसाद दाभोळकर यांनी महाराष्ट्र सहिष्णु आहे की असहिष्णु या विषयावर चर्चा करावी लागते, यातच सारे आले. अशी खोचक टीका केली. संपत देसाई यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे लक्ष वेधून सहिष्णुता ही धर्म, जात, प्रांत, व्यवसायानुसार कशी बदलली जाते, याचे स्पष्टीकरण केले. सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.