कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रकल्प क्षेत्रात आणखी एका नवीन नर वाघाची अधिकृत नोंद झाली असून, त्याला एसटीआर टी९ (‘STR T9’) असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक मार्गदर्शक (गाईड) मंडळींनी या वाघाचे ‘शिलेदार’ असे नामकरण केले आहे. या नव्या वाघाच्या आगमनामुळे सह्याद्री विस्तीर्ण प्रदेशातील वाघांची एकूण संख्या आता सातवर पोहोचली आहे.
नव्याने दाखल झालेला हा नर वाघ गेल्या दोन महिन्यांपासून चांदोली नॅशनल पार्क परिसरातील विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये सातत्याने दिसून येत आहे. त्याचे स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यानंतर त्याची ओळख निश्चित करण्यात आली आहे.
सध्या टी ९ हा ‘शिलेदार’ टी ५ ‘तारा’ या वाघिणीच्या अधिवासात फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे तारा वाघिणीच्या क्षेत्रात आधीपासूनच दोन नर वाघांची वर्दळ आहे. त्यामुळे या परिसरातील हालचालींना अधिक वेग आला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले, सध्या प्रकल्पातील टी ५ तारा ह्या वाघिणीच्या क्षेत्रात टी १ ‘सेनापती’, टी २ ‘सुभेदार’ आणि नव्याने नोंद झालेला टी ९ ‘शिलेदार’ हे तीन नर वाघ फिरताना आढळत आहेत. तारा भविष्यात कोणत्या नराची निवड करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, एखाद्या सक्षम वाघिणीच्या क्षेत्रात एकापेक्षा अधिक नरांची उपस्थिती ही त्या भागातील परिसंस्थेची ताकद दर्शवते. यामुळे प्रजननाची शक्यता वाढते आणि वाघसंख्येच्या स्थैर्यास हातभार लागतो.
मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे म्हणाले, ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. यामुळे सह्याद्रीतील जैवविविधता अधिक अधोरेखित होते. प्रकल्पाला जोडणाऱ्या राधानगरी तसेच तिलारी- दोडामार्ग येथील जंगल क्षेत्रांचा कॉरिडॉर वाघांच्या मुक्त संचारासाठी आणि प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
सह्याद्रीतील सात वाघांची नावे
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सध्या नोंद असलेले वाघ पुढीलप्रमाणे; T1 – सेनापती, T2 – सुभेदार, T3 – बाजी, T4 – चंदा, T5 – तारा, T6 – हिरकणी, T9 – शिलेदार या सर्व वाघांच्या हालचालींवर वन विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नैसर्गिक कॉरिडॉर सक्षम
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, विविध अभयारण्ये आणि जंगल पट्ट्यांना जोडणारे नैसर्गिक कॉरिडॉर सक्षम राहिल्यास वाघांचे स्थलांतर सुलभ होते, नवीन नर दाखल होतात आणि आनुवंशिक विविधता टिकून राहते.
संवर्धनाच्या प्रयत्नांना यश
सह्याद्री परिसरातील वाढती वाघसंख्या ही वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि वन्यजीवप्रेमी यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. कॅमेरा ट्रॅप, नियमित पाऊलखुणा (पगमार्क) सर्वेक्षण आणि अधिवास संरक्षण यामुळे प्रकल्पातील वाघांची अचूक नोंद व देखरेख शक्य होत आहे. नव्या ‘शिलेदार’च्या आगमनामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात या वाघांच्या हालचाली आणि संभाव्य प्रजननावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘SKT 21’चा सह्याद्रीकडे प्रवास
सह्याद्री-कोकण टायगर SKT 21 या तरुण नर वाघाचे पहिले छायाचित्र डिसेंबर २०२४ मध्ये सावंतवाडी वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपले गेले. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये तो दाजीपूर वन्यजीव अभयारण्य येथे आढळला. नैसर्गिक टायगर कॉरिडॉरमधून उत्तरेकडे स्थलांतर करत अखेर जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याची नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) मध्ये झाली. वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी (WCT) यांच्या मते, हा प्रवास सह्याद्रीकडे जाणाऱ्या कॉरिडॉरचे संवर्धनातील महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.
