कराड : पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेचा महत्त्वाचा प्रदेश राधानगरी वन्यजीव अभयारण्य परिसरात वाघांच्या उपस्थितीबाबत उत्साहवर्धक घडामोड समोर आली. नुकत्याच नोंद झालेल्या ‘रायबा’ (वन संकेत क्रमांक एसटीआर-०७) व ‘सरदार’ (एसटीआर- ०८) या प्रौढ वाघांनंतर आता ‘राणोजी’ असे नाव देण्यात आलेल्या (एसटीआर-१०) या नव्या वाघाची नोंद झाली आहे. या नव्या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या आता दहावर पोहोचली आहे. त्यामध्ये सात नर आणि तीन मादी वाघांचा समावेश आहे.
वन विभागाने कॅमेरा ट्रॅप्स, पगमार्क्स आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे या वाघाची ओळख निश्चित केली आहे. सध्या ‘राणोजी’ राधानगरी परिसरात स्वतःची स्वतंत्र हद्द (टेरिटरी) निर्माण करत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. या नव्या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या आता दहावर पोहोचली आहे. त्यामध्ये सात नर आणि तीन मादी वाघांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, ‘सह्याद्री’तील वाघसंख्या ही केवळ कृत्रिम पुनर्वसनावर अवलंबून नसून, नैसर्गिक स्थलांतरातून वाढत असल्याचे दिसून येत आहे. सावंतवाडी-दोडामार्ग ते राधानगरी हे नैसर्गिक वन्यजीव क्षेत्र (कॉरिडॉर) वाघांच्या मुक्त संचारासाठी महत्त्वाचे ठरत असल्यानेच त्यांच्या जनुकीय विविधतेचे जतन होत असून, दीर्घकालीन संवर्धनाला बळ मिळत आहे.
वन विभागाकडून वाघांच्या हालचाली, अधिवास, पाणवठे आणि अन्नसाखळी यांचा सखोल अभ्यास सुरू असून, भविष्यातील व्यवस्थापन आराखड्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार या प्रकल्पात ठरावीक संख्येने वाघांच्या पुनर्वसनाची योजना आहे. त्याअंतर्गत काही मादी वाघिणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात आल्या आहेत. सध्या नर वाघांची संख्या अधिक असल्याने वंशवृद्धीसाठी मादी वाघिणींची गरज आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, सरदार, शिलेदार आणि राणोजी असे आतापर्यंत ओळखले गेलेले दहा वाघ आहेत. त्यांची वाढती संख्या आणि स्थिर अधिवास यांमुळे ‘सह्याद्री’तील वाघ संवर्धन प्रयत्नांना यश मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
राधानगरीला पर्यटनाची मोठी संधी
राधानगरी अभयारण्य परिसरात आणखी एखादी मादी वाघीण सोडल्यास वाघांची नैसर्गिक वाढ होईल. त्यामुळे संवर्धनासोबत पर्यटनालाही चालना मिळेल. या अभयारण्यात वाघांची वाढती संख्या ही पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी आहे. घनदाट अरण्य, नैसर्गिक अधिवास आणि समृद्ध जैवविविधतेमुळे हा भाग निसर्गप्रेमींना आकर्षित करत आहे. नियोजनबद्ध ‘पर्यावरणपूरक पर्यटन’ (इको-टुरिझम) विकसित केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
- रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक
