कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्याला जोडणाऱ्या संवेदनशील व्याघ्र भ्रमण मार्गामुळे जिल्ह्यातील ३७७ गावे बाधित होण्याची भीती मंगळवारी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आमदारांनी मंगळवारी विधानसभेत व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना वन मंत्री गणेश नाईक यांनी या प्रकल्पातून शक्य तितकी गावे वागण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्र्वासित केले.
चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडत या प्रश्नांकडे लक्ष वेधले. संवेदनशील व्याघ्र भ्रमण मार्गामुळे जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आधीच हत्ती, बिबटे, गवे, डुक्कर यामुळे चंदगड भागात शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत वन विभागाचे निर्बंध लागू करावेत अशी मागणी त्यांनी केली. त्यावर वन मंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी हे लोकप्रतिनिधी सोबत तेथे जाऊन बैठक घेतील. या भ्रमण मार्गामुळे सामान्य जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगितले.
सांगली जिल्ह्यातील आमदार जयंत पाटील यांनी चांदोली भागात वाघ आणून सोडले आहेत. या भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील प्राणी नागरी वस्तीत येत आहेत. शिवाजी पाटील यांचा मुद्दा योग्य आहे. अजूनही प्रकल्पग्रस्ताना मदत मिळाली नाही, असा मुद्दा मांडला. त्यावर गणेश नाईक यांनी बांबू लागवड करून ते क्षेत्र बंदिस्त केलं जाईल. अनेक गावात कुत्री, वासर शिकार झाली आहेत. यातून जितकी गाव वगळता येतील त्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उत्तर दिले.
करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची यापूर्वी बैठक झाली होती. व्याघ्र प्रकल्प मध्ये नेमके किती वाघ असणार आहेत,असा प्रश्न उपस्थित केला. मंत्री गणेश नाईक यांनी महाराष्ट्रात वाघांची संख्या १० वर्षांपूर्वी १११ होती. आज ती संख्या ४५० झाली आहे. वाघाना इतरत्र प्रकल्पमध्ये हलवायची गरज आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन बिघडणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे आश्वासित केले.
