सांगली : ‘रंगभूमीची सेवा केली असे मी म्हणणार नाही, तर रंगभूमीशी मैत्री केली. वयाच्या नव्वदीनंतरही मनात दडलेले खट्याळ मूल बाहेर पडायला तयार नाही. मुलांना शिकवताना आपण मुलांकडूनच अधिक शिकत असतो,’ अशा शब्दांत ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांनी आपल्या नाट्यप्रवासातील आठवणींना उजाळा दिला.
अखिल महाराष्ट्र मराठी नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक गुरुवारी ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांना प्रदान करण्यात आले. अखिल महाराष्ट्र मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप विष्णुदास भावे गौरव पदक, २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे होते. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत केले, तर डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले.
सत्काराला उत्तर देताना सई परांजपे यांनी आपल्या रंगभूमीवरील प्रवासाचा पट उलगडला. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आई शकुंतला परांजपे यांच्यामुळे नाट्यविश्वाचा जादुई स्पर्श अनुभवायला मिळाला. फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सादर केलेल्या नाटकाला तीन पारितोषिके मिळाली. हाच आपल्या कलाप्रवासातील पहिला सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मुलांना आपण शिकवत नाही, तर मुलांकडून आपण शिकत असतो. नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतरही मनातील खट्याळ मूल अजूनही तसेच आहे. ते शरीरातून बाहेर जायला तयार नाही,’ असे सांगत त्यांनी उपस्थितांना हसवले.
मराठी रंगभूमीतील बदलांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मेलोड्रामा आणि रडकथांना फाटा देत रंगभूमीवर नवनवीन प्रयोग होत आहेत. नवे विषय, नवी मांडणी आणि प्रयोगशीलतेमुळे मराठी रंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे. रंगभूमीशी आयुष्यभर जपलेले नाते हा आनंदाचा आणि समाधानाचा प्रवास असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
