सोलापूर: ‘सैराट’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता ‘सल्या’ म्हणजेच अरबाज शेख याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात तीव्र मनस्ताप सहन करावा लागला. अरबाजच्या वडिलांच्या उपचारादरम्यान रुग्णालयाने स्वतःच्याच मेडिकलमधून दुप्पट दराने औषधे खरेदी करण्याची सक्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अरबाजने समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारीत करीत रडत-रडत आपली व्यथा मांडली होती.
त्याची तत्काळ दखल घेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चौकशीचे आदेश दिले. यानंतर अवघ्या पाच तासांत प्रशासनाने दणका देत रुग्णालयाशी सलग्न मेडिकलला आँषध विक्री थांबविण्याचे आदेश दिले. अरबाज शेख याच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सोलापूरच्या ‘नोबेल हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने बाहेरील मेडिकलमध्ये २० हजारांना मिळणारी औषधे स्वतःच्या संलग्न मेडिकलमधून तब्बल ४० हजार रुपयांना घेण्यास सक्ती केल्याचा आरोप अरबाजने केला.
तसेच, उपचारातील दुर्लक्ष आणि अवाजवी बिल आकारणीबाबतही गंभीर आरोप केले. अन्न व आँषध प्रशासनाच्या नियमांनुसार, रुग्णांना कोणत्याही परवानाधारक दुकानातून औषधे घेण्याचा अधिकार आहे. विशिष्ट दुकानातूनच औषध खरेदीची सक्ती करणे हा नियमांचा भंग असल्याने आयुक्त मुंढे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
औषध विभागाचे सोलापूरचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्या पथकाने नोबेल हॉस्पिटलमधील ‘फातीमा मेडिकल’वर धाड टाकली. गोडसे म्हणाले, “तपासणीत औषध साठवणूक आणि बिलिंगमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. रुग्णांना हव्या त्या ठिकाणाहून औषध खरेदीचा अधिकार असल्याचा फलकही तिथे नव्हता. मुदतबाह्य आँषध स्वतंत्र ठवणे आवश्य असते. पण, नियमीत आँषधाच्या जवळपास ती ठेवल्याची आढळली आहेत. इतर, काही त्रृटी आढळलेल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्याने आम्ही मेडिकल सील करून औषध विक्री थांबवली आहे, असेही सहाय्यक आयुक्त गोडसे यांनी सांगितले.
“अभिनेता अरबाज शेख यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. अरबाज शेख किंवा कोणत्याही रुग्णाला औषधं घेण्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नव्हते. अरबाज यांचे वडिलांना न्युरो संदर्भातील आजार होता, त्यामुळे त्यांना खर्चाची कल्पना दिलेली होती. मात्र त्यानंतर देखील त्याने हा विडिओ का केला? याची कल्पना आम्हाला नाही पण, आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. डॉ. अमजदअली सय्यद (प्रमुख, नोबेल हॉस्पिटल)
