कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा महत्त्वाच्या निवडणुका संपल्या असल्या तरी राजकीय घडामोडी सुरूच राहिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा हात सोडून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले कागल मधील शाहू उद्योग समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या बुधवारी (८ एप्रिल) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा मुंबई येथे पक्ष प्रवेश होणार आहे. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष असलेले घाटगे यांनी २०१९ मध्ये कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तर गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीची उमेदवारी मुश्रीफ यांना मिळाल्याने घाटगे यांनी भाजपची साथ सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली होती.

अलीकडे झालेल्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी हात मिळवणी केली होती. तेव्हापासून त्यांचा प्रवास भाजपच्या दिशेने सुरू झाला होता. आता त्यावर अधिकृततेची मोहर उमटली आहे. घाटगे यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

अलीकडील बदलाचे परिणाम

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही घाटगे गटाने चांगली कामगिरी केली. नगरपालिकेत कागलमध्ये नऊ तर मुरगूडमध्ये एक अशा दहा जागांवर विजय मिळविला. एक स्वीकृत नगरसेवक व कागलमध्ये जयवंत रावण यांच्या रूपाने उपनगराध्यक्ष पदही त्यांच्या गटाकडे आहे. तसेच, तीन पंचायत समिती सदस्य व एक जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या गटातून निवडून आले आहेत. त्यांच्या गटाच्या सुवर्णा पाटील यांची कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड होत भाजपच्या त्या पहिल्या सभापती ठरल्या. ही देखील त्यांच्या नेतृत्वाची मोठी कामगिरी मानली जाते.

राजकीय पार्श्वभूमी कोणती?

लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे ते वंशज आहेत. सहकार क्षेत्रातही घाटगे यांचे वर्चस्व ठळक आहे. सहकार महर्षी स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे संस्थापक असलेल्या देशाच्या सहकारी साखर कारखानदारीत अग्रेसर शाहू साखर कारखाना, राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक, शाहू दूध संघ, शाहू कृषी संघ आणि शिक्षण संकुल अशा विविध संस्थांचे ते नेतृत्व करत आहेत. सीए सारखे उच्चशिक्षित असलेल्या घाटगे यांची सहकार क्षेत्रातील अभ्यासू, दूरदृष्टी असलेले नेतृत्व अशी ओळख आहे.

समरजितसिंह घाटगे यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना संघटनात्मक बांधणी मजबूत केली होती. तसेच, गत दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी प्रभावी लढत देत आपले राजकीय अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले होते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील पक्षाची ताकद अधिक भक्कम होण्यास मदत होईल अशी चिन्हे आहेत.