कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. बुधवारी सकाळीच कोल्हापूर आणि सांगली पोलीसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाई समीर गायकवाड याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. संजय कुमार म्हणाले, समीर गायकवाड याच्यावर पोलीस गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवून होते. त्याचे फोन कॉल्सही पोलीसांनी तपासले होते. त्या आधारेच त्याला अटक करण्यात आली आहे. समीर गायकवाडच हल्लेखोर होता का, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, आमचा संशय त्याच्यावरच आहे. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. समीर गायकवाड हा १९९८ पासून सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. त्याचे कुटुंबीय गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमातच राहात असल्याचेही पोलीसांनी सांगितले. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळून पोलीसांनी बुधवारी सकाळी समीर गायकवाडला ताब्यात घेतले.