कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने आपणास न्यायालयास काही महत्त्वाचे सांगायचे असल्याचे नमूद केल्याने त्याच्या मागणीवरून मंगळवारी न्यायालयात उभय बाजूच्या वकिलांनी म्हणणे मांडले. याबाबतचा निर्णय बुधवारी देण्यात येणार असल्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी घोषित केले.
विशेष पोलीस तपास पथकाने सांगली येथे राहात असलेल्या सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या घरावर पानसरे खूनप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी छापा टाकला होता. दुसऱ्या दिवशी त्याला अटक करून न्यायालयासमोर दाखल केले होते. तेव्हा न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. तर अलीकडे त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात येऊन त्यामध्ये वाढ करण्यात आली होती. गत सुनावणीच्या वेळी पुरेशा पोलीस बंदोबस्ताअभावी गायकवाडला न्यायालयात आणता आले नव्हते. तथापि, गायकवाड याने आपणास काही महत्त्वाची माहिती न्यायालयासमोर विशद करायची असल्याचे सांगितले होते.
गायकवाड याच्या भूमिकेबाबत आज न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी अभिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी गायकवाड त्याची माहिती वकिलाकरवी न्यायालयात देऊ शकतो वा पोस्टाद्वारे म्हणणे पाठवू शकतो. त्यासाठी न्यायालयात येण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यास गायकवाड याचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आक्षेप घेत बुदले यांचे म्हणणे दुर्दैवी व हास्यास्पद असल्याचे म्हटले. गायकवाडला न्यायालयासमोर म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावर न्यायालय उद्या कोणता आदेश देते याकडे लक्ष लागले आहे.