सांगली : पोलिसांच्या विशेष मोहिमेला प्रतिसाद देत पारधी समाजातील तब्बल १४ फरारी व पाहिजे आरोपी पोलिसांसमोर हजर झाले. सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २० प्रलंबित गुन्ह्यांमध्ये या आरोपींचा सहभाग असून, त्यांना पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार सांगली जिल्ह्यात पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या संकल्पनेतून ‘पाहिजे, फरारी आरोपींची आत्मसमर्पण योजना’ राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींचे नातेवाईक, परिचित तसेच विविध ठिकाणी संपर्क साधून त्यांचा शोध घेतला.

आरोपींना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांतून दोन फरारी आणि १२ पाहिजे असे एकूण १४ आरोपी पोलिसांसमोर हजर झाले.

या आरोपींविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यातील सात, आष्टा पोलीस ठाण्यातील तीन, इस्लामपूर पोलीस ठाण्यातील सहा आणि कुंडल पोलीस ठाण्यातील चार अशा एकूण २० गुन्ह्यांचा तपास प्रलंबित होता. यामध्ये शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह एलसीबीच्या पथकाने आरोपींचा शोध व समुपदेशनासाठी विशेष प्रयत्न केले. पोलीस मुख्यालय, सांगली येथे झालेल्या या उपक्रमाला अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभला.