सांगली : विक्रीसाठी आणलेले साडेचार कोटींचे अंबरग्रीस पोलीसांनी जप्त केले असून एकाला अटक केली सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरला जाणारा हा पदार्थ अत्यंत दुर्मिळ असल्याने याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. या तस्करी प्रकरणी पोलीसांनी दोघाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिलेली माहिती अशी, कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे व्हेलच्या उलटीसदृश अंबरग्रिस या प्रतिबंधित पदार्थाची विक्री करण्यासाठी तरूण दुचाकीवरून आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डिग्रज येथील शक्ती पॉलिमर्स कंपनीच्या दक्षिण बाजूला सापळा लावण्यात आला होता. यावेळी संशयित अमोल आकाराम सिद (वय ३१, रा. घुणकी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हा दुचाकीवर (एम एच ०९ एफ झेड ७२६८) थांबला होता. पोलीसांनी त्याला ताब्यात घेउन चौकशी केली असता त्याच्याजवळ दोन पाकिटे आढळून आली. त्याची तपासणी केली असता यामध्ये तब्बल ४ किलो ५२१ ग्रॅम अंबरग्रिस म्हणजेच व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ आढळून आला. याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे किंमत ४ कोटी ५२ लाख १० हजार रुपये आहे.
या प्रकरणी अमोल सिद्ध याला अटक करण्यात आली आहे. त्यांने हा पदार्थ मालवण येथील निखिल नामक व्यक्तीकडून विक्री करण्यासाठी आणला असल्याची कबुली दिली आहे. या तस्करीतील मुख्य संशयित अद्याप पोलीसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, दोघाविरूध्द वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे निरीक्षक श्री. देशमुख यांनी सांगितले.
अंबरग्रिस हा स्पर्म व्हेलच्या पचनसंस्थेशी संबंधित दुर्मीळ पदार्थ असून त्याचा वापर पारंपरिकरीत्या सुगंधी द्रव्यांमध्ये केला जात असल्याचे सांगितले जाते. त्याच्या दुर्मीळतेमुळे त्याला मोठी किंमत मिळते. या कारवाईमुळे वन्यजीवांशी संबंधित प्रतिबंधित पदार्थाच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा प्रकार उघडकीस आला असून, जप्त केलेला पदार्थ खरोखर अंबरग्रिस आहे का, याची पुढील तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
