सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आले असून सांगली, कवठेमहांकाळ आणि जत  अशा तीन स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येत असल्याची घोषणा सोमवारी जिल्हा उपनिबंधकांनी एका आदेशाने केली. बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून तीनही बाजार समितीवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाचे चेंबर ऑफ  कॉमर्सने स्वागत केले असून बर्‍याच दिवसांची आमची मागणी मान्य झाल्याचे अध्यक्ष अमरसिंह देसाई यांनी म्हटले आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्याचा समावेश होता. तीनही तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती असावी असे शासनाचे धोरण आहे. या धोरणानुसार पणन मंडळाने तीन तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, बाजार समितीच्या त्रिभाजनाला राजकीय विरोध होता. बाजार समिती संचालकांनीही याबाबत मुंबई उच्च न्यायालाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर  याचिका दाखल केली आर्हे. मात्र, या याचिकेवर त्रिभाजन करण्यास स्थगिती देण्यात आली नसल्याने अखेर पणन मंडळाच्या अहवालानुसार शासनाने त्रिभाजन करण्याचा निर्णय आज जाहीर केला.

यानुसार सांगली बाजार समिती ही मिरजेसाठी, जतसाठी जत बाजार समिती आणि कवठेमहांकाळसाठी कवठेमहांकाळ बाजार समिती अस्तित्वात आली आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या बाजार समितीसाठी प्रशासक नियुयत करण्यात आले आहेत. सांगलीसाठी जिल्हा उप निबंधक सुनील चव्हाण हे  प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष आणि  उपनिबंधक बिपिन मोहिते  हे प्रशासकीय सदस्य  आहेत. तर कवठेमहांकाळ बाजार समितीचे प्रशासक म्हणून अनुष्का देशमुख आणि जत बाजार समितीचे प्रशासक म्हणून चेतन जावीर यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. ज्या बाजार समितीकडे जी मालमत्ता आहे ती मालमत्ता त्या बाजार समितीकडेच राहील असेही आदेशात म्हटले आहे.

बाजार समिती त्रिभाजन करण्याच्या निर्णयाचे सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. देसाई यांनी स्वागत केले असून गेल्या तीन दशकांची आमची मागणी मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले. सांगली बाजार समितीत सांगलीचे वार्षिक उत्पन्न १७ ते १८ कोटी असून यापैकी सुमारे ८० टक्के निधी कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील सुविधावर खर्च होत होता. यामुळे सांगलीत सुविधा पुरविण्यावर मर्यादा येत होत्या. आता त्रिभाजनामुळे सांगलीत जमा होणारा महसूलातून सांगलीत अधिक चांगल्या सुविधा देता येतील असेही त्यांनी सांगितले.