सांगली : वैद्यकीय वापरासाठी असलेल्या औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यासाठी बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आष्टा येथे पकडले. त्यांच्याकडून ट्रेमीमाईड औषधी द्रव्याच्या ७४ इंजेक्शनच्या बाटल्या व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी वैद्यकीय औषधांचा नशेसाठी वापर, विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने माहितीच्या आधारे आष्टा हद्दीतील घाटगे मळा परिसरात सापळा रचला.
हवालदार संजय पाटील व अभिजीत ठाणेकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, श्रीराम नाष्टा सेंटरसमोर दोन इसम यूनिकॉर्न मोटारसायकलवरून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेमीमाईड इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पथकाने परिसरात पाळत ठेवली असता संशयित दोघे तेथे आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली.
चौकशीत त्यांनी आपली नावे अभिषेक भिमराव सरवदे (वय २६, रा. शिराळकर कॉलनी, दुधगाव रोड, आष्टा) व रेहान रफीक मुजावर (वय २०, रा. गोर्डे चौक, आष्टा) अशी सांगितली. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत अभिषेक सरवदे याच्या ताब्यातील कापडी पिशवीत ट्रेमीमाईड औषधी द्रव्याच्या ७४ इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या.
या इंजेक्शनची विक्री अथवा साठा करण्याचा परवाना नसल्याचे दोघांनीही कबूल केले. तसेच ही इंजेक्शने इंडिया मार्ट ॲपवरून ऑनलाइन मागविल्याचे सांगितले. तरुण वर्गामध्ये नशा व उत्तेजक द्रव्य म्हणून त्यांचा वापर होत असल्याने जादा दराने विक्री करण्यासाठी ती आणल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.यानंतर पोलिसांनी पंचनाम्याद्वारे २६ हजाराचा इंजेक्शनचा साठा व एक लाखाची मोटारसायकल जप्त केली. याप्रकरणी पोकॉं अभिजीत ठाणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
