सांगली : दागिने तयार करण्यासाठी दिलेले चार किलो सोने लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लाऊन पोलीसांनी संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून सोन्यासह दोन कोटींचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे. आटपाडी तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या चार किलो चोख सोने लंपास प्रकरणाचा आटपाडी पोलिसांनी उलगडा करत मोठे यश मिळविले आहे. अवघ्या काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी पंढरपूर तालुक्यातील दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ९९ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत १ किलो ३५५ ग्रॅम सोन्याची बिस्किटे, स्विफ्ट कार, स्कॉर्पिओ, रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आल्याने आरोपींच्या गैरव्यवहाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे.
कौठुळी येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक विकास विलास कदम यांच्या मेसर्स साहिल ज्वेलर्स अँड बुलियन या आस्थापनातून कलकत्ता येथे दागिने तयार करण्यासाठी पाठविण्यात आलेले सुमारे चार किलो चोख सोने कामगार आणि त्यांच्या साथीदारांनी परस्पर लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सोमनाथ अंबादास फाटे, बालाजी रामदास पाटील, प्रकाश ऊर्फ पप्पू भारत चव्हाण, बाळू नामदेव पुजारी, शरद भिमराव पवार आणि अतुल गुलाबराव शिंदे अशा सहा जणांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशेंद्रसिंग बायस व तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. पोलीस निरीक्षक पवार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार संशयित पुजारी हा आटपाडी पोलिसांच्या हद्दीत येणार असल्याचे समजताच दिघंची परिसरात सापळा रचण्यात आला. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडून १ किलो ३५५ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची बिस्किटे, चोरीच्या सोन्याच्या पैशातून खरेदी केलेली स्विफ्ट कार (एमएच-१० सीएन-५४२७) आणि सॅमसंग मोबाईल जप्त करण्यात आला.
त्यानंतर प्रकाश ऊर्फ पप्पू चव्हाण याच्याकडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ (एमएच-१३ ईएक्स-३८२३) हस्तगत करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून मिळून एकूण १ कोटी ९९ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. विश्वासाने दागिने तयार करण्यासाठी दिलेले सोने परस्पर विकून त्यातून चारचाकी वाहने खरेदी करण्याचा आरोपींचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.
चार किलो सोने लंपाससारख्या क्लिष्ट गुन्ह्याचा वेगाने छडा लावत जवळपास दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करणे ही आटपाडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. गोपनीय माहितीचे अचूक जाळे, तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य पोलीसांना शक्य झाले. पोलीस निरीक्षक श्री. पवार यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाच्या या कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत असून उर्वरित आरोपीही लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
