सांगली : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे बंद घराचे कुलूप तोडून जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे ८ लाख ४९ हजार ४०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, असा एकूण ९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेलकरंजी येथील फिर्यादी २२ जून २०२६ रोजी दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करून बेडरूममधील कपाटातील सोन्याचे व जकाई देवीचे चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते.

२९ ऑक्टोबर रोजी पथकातील पोलीस हवालदार संदीप नलावडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नेलकरंजी येथील चोरीतील जकाई देवीचे चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी सात जण दोन दुचाकींवरून सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील वुडलँड हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या झुलेलाल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार आहेत.

या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. यावेळी दोन दुचाकींजवळ थांबलेल्या सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरबाज मिराखान, बादशाह यमतनाळ, सोहेल दड्डीकर, प्रमोद सव्वाशे, शशीकांत दबडे, विनायक पाटील आणि विनोद यादव अशी त्यांची नावे निष्पन्न झाली. हे सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व कागल तालुक्यातील रहिवासी असून, त्यापैकी एकजण सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी येथील आहे.

संशयित बादशाह यमतनाळ याच्या ताब्यातील दुचाकीवर विमल पानमसाल्याच्या पिशवीत लपवून ठेवलेले चांदीचे दागिने आढळले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर चार महिन्यांपूर्वी साथीदारांसह नेलकरंजी येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. या चोरीत इचलकरंजी येथील तबरेज खान, सद्दाम पठाण आणि बलगवडे येथील उमाजी गुजले यांचाही सहभाग असल्याचे त्याने सांगितले.

चोरीसाठी हिरो कंपनीची सीडी डिलक्स आणि टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर या दुचाकींचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी चांदीचे छत्र, समई, घोडा, पाळणे, घंटा, किरीट, करंडा, आरती पात्र, पैंजण, तांब्या, तलवार, गणपतीची मूर्ती आणि चांदीची नाणी असा ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन्ही दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.