सांगली : तासगाव–वायफळे रस्त्यावर पुणदी गावाच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पोलिस शिपायासह दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात कोल्हापूर येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई अमोल सुखदेव बुरुंगले (वय ३१, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) आणि दुसऱ्या दुचाकीवरील वैभव सुरेश तोरवी (वय २१, रा. साईराम कॉलनी, कर्नाळ रोड, सांगली, मूळ गाव – कोसारी, ता. जत) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच अर्जुन अशोक हात्तेकर (रा. कोसारी, ता. जत) हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.

पुणदी गावाच्या हद्दीत चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक बसली. या भीषण धडकेत दोन्ही दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पोलिस शिपाई अमोल बुरुंगले यांचा मृत्यू झाला, तर वैभव तोरवी यांचा सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.