सांगली : वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आणि मानवी वस्तीत होत असलेला शिरकाव थांबवण्यासाठी संरक्षक कुंपण व चर खोदण्याची कामे येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येतील. तसेच अन्यत्र असणारा मगरींचा उपद्रव कमी करुन त्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी चांदोली येथे क्रोकोडाईल पार्क सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
 
शिराळा विधानसभा मतदारसंघातील वन विभागाशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील झोळंबी पठाराचा कास पठाराच्या धर्तीवर विकास करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी कोअर झोनमधील आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याकरिता आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

चांदोली परिसरात निमल सफारी सुरू करणे आणि निमल पार्क उभारण्याच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वारणा आणि कृष्णा नदीच्या पात्रातील मगरींचा उपद्रव कमी करण्यासाठी चांदोली अभयारण्याजवळ क्रोकोडाईल पार्क उभारण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीनंतर आ. देशमुख यांनी सांगितले, वन्यप्राण्यांच्या उपचार आणि संरक्षणासाठी वन्यजीव उपचार केंद्र सुरू करण्याबरोबरच रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर उभारण्याबाबत चर्चा झाली. यासाठी जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांनी तातडीने जागेची पाहणी करून अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय चांदोली व सह्याद्री परिसरातील पर्यटन विकासासाठी इको टुरिझमचा प्रस्ताव तयार करून मंजुरी देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.