सांगली : बाळुमामांच्या मेंढरांचे दर्शन घडवून आणण्याचे आमिष दाखवून वृद्धांना दुचाकीवरून निर्जनस्थळी नेऊन दागिने लुटणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. मारुती बयाजी कोटे (४७, रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून १३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिरज तालुक्यातील बेळंकी येथे १६ ऑगस्ट रोजी एक वृद्ध महिला रस्त्यावर थांबली असताना आरोपीने दुचाकीवरून येऊन आपण पुजारी असल्याचे सांगितले. जवळच बाळुमामांच्या मेंढ्या आल्याचे सांगून दर्शन करून पुन्हा घरी सोडतो, असे आमिष दाखवून त्यांना दुचाकीवर बसविले. त्यानंतर त्यांना अनोळखी ठिकाणी नेऊन बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसडा मारून काढून घेतली आणि आरोपी पसार झाला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यांमध्येही आठवडी बाजार तसेच बसची वाट पाहत थांबलेल्या वृद्धांना दुचाकीवरून सोडण्याच्या बहाण्याने लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

त्यानुसार पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तपास सुरू केला. २४ ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे कुपवाड येथील चाणक्य चौक परिसरातून मारुती कोटे याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने बेळंकी येथील वृद्ध महिलेला बाळुमामांच्या मेंढ्यांचे दर्शन घडविण्याच्या बहाण्याने नेऊन तिचे दागिने लुटल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील चौकशीत त्याने गेल्या सहा महिन्यांपासून जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यांतील विविध गावांमध्ये अशाच प्रकारे वृद्धांना लक्ष्य केल्याचे उघड झाले.

बसची वाट पाहणाऱ्या वृद्धांना दुचाकीवरून घरी सोडण्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेणे तसेच काही वृद्धांना दारू पाजून बेशुद्ध केल्यानंतर त्यांच्याकडील दागिने लुटणे, अशा प्रकारे त्याने गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली. लुटलेले दागिने सोनारांकडे विकल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.

आरोपीविरुद्ध मिरज ग्रामीण, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये जबरी चोरी व चोरीचे एकूण आठ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक अधिक तपास करीत आहे.

संशयित आरोपीकडून १३ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ९० ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यामध्ये मणीमंगळसूत्र, बोरमाळ, कानातील कुंडले, कर्णफुले, झुमके, कानातील साखळ्या, बदाम, बुगड्या आदी दागिन्यांचा समावेश आहे. तसेच एक लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.