सांगली : वारंवार वाद घालणाऱ्या मनोरुग्ण मुलाचा बापानेच खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे घडली. पोलीसांनी संशयित पित्याला अटक केली आहे.

निखिल अरुण यादव (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. निखिल हा गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. तो घरात वारंवार वाद घालत असल्याने कुटुंबीय त्रस्त होते. मध्यरात्री त्याने वडील अरुण यशवंत यादव यांच्याशी वाद झाला. सततच्या वादाला कंटाळून रविवारी पहाटे सुमारे ४ च्या सुमारास अरुण यादव यांनी निखिल झोपेत असताना त्याच्यावर दगडाने हल्ला केला. यात निखिलचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, कासेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या आई सुप्रिया अरुण यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत निखिलचा भाऊ देखील त्याच्या त्रासास कंटाळून तो ईश्वरपुरात आपल्या पत्नी बरोबर राहतो. तर आई अंगणवाडी सेविका आहे. पोलिसांनी संशयित आरोपी अरुण यादव यांना चौकशीअंती अटक केली आहे.