सांगली : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी मांगले (ता. शिराळा) येथील मंगेश चंद्रकांत कांबळे याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ईश्वरपूरचे जिल्हा न्यायाधीश देविदास एच. केळूसकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) व २३८ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेसह एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दि. २७ मार्च २०२५ रोजी मांगले येथील आरोपीच्या राहत्या घरी ही घटना घडली होती. मंगेश कांबळे याने पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. विशेष म्हणजे ही घटना त्यांचा मुलगा शिवम कांबळे याने प्रत्यक्ष पाहिली होती. खून केल्यानंतर आरोपीने प्राजक्ताचा मृतदेह घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवला. पेटीचे दोन्ही दरवाजे बंद करून खोलीलाही कुलूप लावून तो निघून गेला होता.
याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मयताची आई व फिर्यादी रंजना अर्जुन चांदणे, प्रत्यक्षदर्शी मुलगा शिवम कांबळे, पंच व अन्य साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मारुती बनसोडे, डॉ. अनिरुद्ध सतीश काकडे तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
पत्नीच्या आयुष्याची पती म्हणून असलेली जबाबदारी पार पाडण्याऐवजी आरोपीने चारित्र्याच्या संशयातून तिचा खून करून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा जोरदार युक्तिवाद सहायक सरकारी वकील ॲड. सतीश केकणीस यांनी न्यायालयात केला.
न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद व साक्षी-पुरावे ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटल्याच्या कामी पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मुद्दसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनंदा सुरेश निकम व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
