सांगली : पत्नीला किराणा माल उधार दिला नाही म्हणून दुकानच जाळण्याचा प्रयत्न पिंपरी खुर्द (ता. आटपाडी) येथे घडला असून आगीत सुमारे  २५ हजाराचे नुकसान झाले आहे.याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित प्रकाश कांबळे यांची पत्नी बाबासाहेब कदम यांच्या किराणा दुकानात खरेदीसाठी आली होती. यावेळी उधार माल देणार नाही असे कदम यांनी सांगितले. यानंतर संशयितांने दुकानात येउन कदम यांच्या पत्नीला शिवीगाळ करत दुकान जाळून टाकण्याची धमकी दिली होती.

यानुसार काल रात्री १० ते सकाळी सव्वा सात या दरम्यान दुकानात पेट्रोल टाकून दुकान पेटविण्यात आले. यामध्ये दुकानातील साखर, डाळ, शेंगदाणे, तांदूळ व खाद्यतेल यांचे सुमारे २५ हजाराचे नुकसान  झाले असल्याची तक्रार दुकानदाराने आटपाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिरातील १२ किलो चांदी लंपास

कडेगाव तालुक्यातील तुपेवाडी येथे येरळा  नदीपात्रालगत असलेल्या महादेव मंदिरातील सुमारे १२ किलो चांदी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी अज्ञाताविरूध्द कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुपेवाडी (खेराडे विटा) येथे येरळा नदीपात्रालगत महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरातील पिंडीला चांदीचे नक्षीकाम केलेल्या पत्र्याने आच्छादन केले होते. तसेच पिंडीवर चांदीचा नाग व चांदीचे अभिषेक पात्र होते. सकाळी दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिरातील पिंडीवरील चांदीच्या वस्तू गायब झाल्याचे लक्षात आले. मंदिराच्या उत्तर बाजूच्या बंद दाराचे  कुलूप तोडून अज्ञातांने  मंदिरातील चांदी लंपास केल्याचे दिसून आले. ही चांदी अंदाजे ११ किलो ते १२ किलो असून याबाबत तानाजी गुजले या पुजार्‍यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे.