सांगली : मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडील सर्व प्रकारची कामे आपण करत असल्याचे सांगून मद्य विक्री्र परवान्यासाठी तब्बल ४० लाख ५४ हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रणजित तुकाराम कुंभार (रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्यासह निशा सगरे नावाच्या महिलेविरोधात जत पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ पासून संशयित कुंभार हा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालयातील तसेच मंत्रालयातील विविध कामांमध्ये आपला संपर्क असल्याचे सांगत होता. त्याने तक्रारदारांच्या पत्नी मुक्ताबाई आवटे यांच्या नावावर मद्यविक्री दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
परवाना प्रक्रिया, मंत्रालयीन परवानग्या व विविध शासकीय कामांसाठी पैसे लागतील, असे सांगून वेळोवेळी संशयितांने तक्रारदारांकडून रक्कम घेतली. दरम्यान, निशा सगरे नावाच्या महिलेनेही आपण मंत्रालयात काम करत असल्याचे सांगून फोन-पे स्कॅनर पाठवून पैसे स्वीकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आजपर्यंत एकूण ४० लाख ५४ हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतरही कोणताही परवाना मिळाला नाही. तसेच आरोपींकडून टाळाटाळ सुरू झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. यानंतर जत पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
