सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सलग तीन खूनाच्या घटना घडल्यानंतर सोमवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांचा मित्रांकडून खून करण्यात आले. तर कुपवाडमध्ये एकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी कृत्यामुळे सामान्यातून चिंता व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.
सांगलीपासून बारा किलोमीटर अंतरावर तासगाव रस्त्यावरील कवलापूर या गावी मित्रांनेच दारूच्या नशेत दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी पहाटे समोर आली आहे. विश्वास सुतार (वय ३२) याचा मित्रानेच किरकोळ कारणावरून मध्यरात्री दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी संशयिताला पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आज सायंकाळपर्यंत सुरू होती.
दुसऱ्या एका घटनेत कुपवाडजवळ बामणोली गावात सचिन माने यांची देशी दारुच्या दुकानात दोन मित्रांनी धारदार हत्याराने वार करून खून केला. घटनेनंतर संशयित पळून गेले असून पोलिसांची दोन पथके संशयितांच्या मागावर आहेत.
कवलापूरचे ग्राम दैवज सिध्देश्वरची यात्रा सुरू होतेी. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले करमणुकीचे कार्यक्रम काल रात्री दीड वाजता संपले. यानंतर आज पहाटे साडेतीन वाजणेच्या सुमारास दारू पिलेला संशयित आरोपी व मृत तरूण यांच्यात वैयक्तिक कारणावरून वाद झाला. या वादातच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ पडलेला मोठा दगड घेउन संशयितांने मृताच्या डोकीत मारला. यात तो जागीच ठार झाला.
खूनाची माहिती मिळताच यात्रेनिमित्त बंदोबस्तास असलेले पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी संशयित आरोपी रोहित उर्फ नवनाथ नाईक याला अटक करण्यात आली आहे. यात्रेत धक्का लागल्यावर विचारणा केल्याने मृत तरुणाने शिवीगाळ केली, यामुळे त्याला मारल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, कुपवाडमधील कापसे प्लॉटमध्ये दगडू केंगार याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला असून त्याच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता. औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याचा मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार आहे.
