सांगली : जत तालुक्यातील डफळापूर येथे चौकात लावण्यात आलेल्या महापुरुषाच्या पोस्टरचा फलक हटविल्याच्या कारणावरून शनिवारी सकाळी दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. या घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यापैकी एका जखमीवर मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हाणामारीत घातक हत्यारांसह लाठ्याकाठ्यांचा वापर झाल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
डफळापूर येथील एका चौकात महापुरुषाचा फलक लावण्यात आला होता. हा फलक हटविण्यात आल्याचे शनिवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेची माहिती गावात वेगाने पसरली आणि चौकात नागरिकांचा जमाव जमा झाला. याचवेळी दोन्ही गट आमनेसामने आल्याने शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
दोन्ही बाजूंकडून लाठ्याकाठ्या तसेच घातक हत्यारांचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या हाणामारीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यात सात जण जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जत पोलीस तातडीने डफळापूर येथे दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. गावातील तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन दंगल नियंत्रक पथकही घटनास्थळी दाखल करण्यात आले. पोलिसांनी संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविल्याने संपूर्ण गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, घटनेनंतर गावातील परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फलक नेमका कोणी व कोणत्या कारणाने हटविला, तसेच हाणामारीस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन पोलीस तपास करीत आहेत.
