सांगली : ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर रोज रात्री सात ते अकरापर्यंत लोड शेडिंग करताय, तिथं काय माणसं रहात नाही काय? कुणी हा नियम बनवला? तिथल्या पोरांनी अभ्यास कसा करायचा? उद्या चोऱ्या वाढल्या तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल खासदार विशाल पाटील यांनी शुक्रवारी दिशा समितीच्या बैठकीत व्यक्त केला. याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलून घ्या आणि भारनियमनच्या पद्धतीत बदल करा, अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. आमदार विश्वजीत कदम, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त संजिता महापात्र व्यासपीठावर होते.

खासदार व आमदारांनी वीज भारनियमन या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला. खासदार पाटील यांनी सूचना करताना एक दिवस मळाभागात, एक दिवस गावठाणात, एक दिवस शहरात भारनियमन करा. रोज फक्त मळाभागावर अन्याय करू नका, चोऱ्या वाढल्या तर अडचण होईल, असे स्पष्ट केले. आमदार देशमुख यांनी दुर्गम भागात लोकांचे रात्री हाल होत असल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधले.

आ. डॉ . कदम यांनी वसगडे येथील रेल्वे आंदोलनातील शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे तातडीने मागे घ्या, मंत्र्यांनी आदेश दिले तरी तुम्ही कार्यवाही का करत नाही, असा जाब विचारला. वसगडे येथील रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजू निमुळत्या झाल्या आहेत, त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना केली. त्यांनी चिंचणी, शिवाजीनगर, हिंगणवाड (ता. कडेगाव) येथील गावांचा पिण्याचा पाणी उपसा बंद झाला असून महावितरणने फिडरबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी सूचना केली.

बिबटे, माकड, मगरींचा बंदोबस्त करण्याबाबत वन विभाग गंभीर नसल्याचा आरोप आ. देशमुख, डॉ. कदम यांनी केला. आमदार बाबर यांनी जनावरांसाठी मिनरल मिक्सचरला जिल्हा परिषदेने जादाचा निधी द्यावा, अशी मागणी केली. सरकारी योजनेतील घरकूल बांधण्यासाठी लोकांना वाळू उपलब्ध करून द्या किंवा सवलतीच्या दरात कृत्रिम वाळू पुरवठ्याबाबत धोरण राबवा, अशी मागणीही त्यांनी केली.

वाळव्यातील गोळी प्रकरणी पोलिसांकडून योग्य कारवाई केली जात नसल्याची तक्रार सरपंच संदेश कांबळे यांनी केली. पोलिसांकडून सामान्य कलम लावून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. ग्रामीण विकास विभागाच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी स्वागत केले. कडेगाव पंचायत समिती सभापती डॉ. जितेश कदम, मिरजेच्या तन्वी कमलेकर आदी उपस्थित होते.