सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लेखनिक पदांच्या भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत २२ नोव्हेंबर २०२६ रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बँकेच्या संचालक मंडळाने आयबीपीएस (IBPS) मार्फत ४४४ कनिष्ठ लेखनिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार २४ जूनपासून ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच भरतीला स्थगिती देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भरतीवरून सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यकाळात ही भरती होणार नसल्याचा दावा केला होता. तर आमदार सदाभाऊ खोत यांनी लेखी परीक्षा असताना संचालक मंडळाकडे उमेदवारांना दहा गुण देण्याचा अधिकार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता.

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उपनिबंधक कार्यालयानेही आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरच भरती प्रक्रियेबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र सहकार व वस्त्रोद्योग विभागाकडून गुरुवारी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना पाठवण्यात आले आहे.