सांगली : अत्यंत चुरशीने लढविल्या गेलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि मिरज पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे यांचा विजय झाला आहे. आ. पडळकर यांचा विजय माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासह प्रस्थापितांना राजकीय धयका मानला जात आहे.
जिल्हा बँकेच्या २१ जागापैकी १५ जागा अविरोध निवडण्यात आल्या असून उर्वरित सहा जागासाठी रविवारी मतदान झाले होते. या सहा जागापैकी तासगाव, मिरज, जत आणि कवठेमहांकाळ या तालुका विकास संस्थातून झालेल्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
जिल्ह्यातील जेष्ठ नेते आ. पाटील यांच्यावर वारंवार टीका करून लक्षवेधून घेणारे आ. पडळकर यांचा संचालक म्हणून बँकेतील प्रवेश रोखण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. त्यांची उमेदवारी निवडणूक अधिकार्यांनी वैध ठरवली होती. या विरूध्द उच्च न्यायालयात आव्हान देउन अवैध ठरविण्यात आली. मात्र, याला आव्हान देत आ. पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देउन उमेदवारी वैध ठरवली.
जतमध्ये आ. पडळकर यांच्या विरोधात विनोद पवार या भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली होती. आ. पडळकर विरोधात सर्व अशी स्थिती असतानाही आ. पडळकर यांनी ८८ पैकी ५४ मते पटकावत विजयावर शिक्कामोर्तब केले. तासगाव तालुका विकास संस्था गटातून माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आरआर आबांच्या पत्नी माजी आमदार सुमनताई पाटील यांना एक मतांने पराभूत करून विजय संपादन केला. कवठेमहांकाळ तालुका गटातून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी आमदार रोहित पाटील समर्थक तानाजी पाटील यांचा ३७ विरूध्द ३३ असा पराभव करून विजय संपादन केला. मिरज तालुका गटातून माजी सभापती कोरे यांनी भाजपचे अनिल शेगुणशे यांचा ४७ विरूध्द १९ अशा मोठ्या फरकाने विजय संपादन केला.
तालुका सोसायटी गटातील निवडणुकीचे निकाल जाहीर करताच मिरजेतील जनावरे बाजारातील शेतकरी भवन परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्याची आताषबाजी करत मोठा जोष साजरा केला.
दरम्यान, आ. पडळकर यांचा विजय हा जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांना धक्का मानला जात आहे. आ.जयंत पाटील यांच्यासह खा. विशाल पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम आदींनी आ.पडळकर यांच्या संचालक मंडळातील अविरोध निवडीस विरोध दर्शवला होता. यामुळे चर्चेची दारे बंद करून त्यांनी निवडणुकीचा मार्ग स्वीकारत विजय संपादन केला.
दरम्यान, २१ जागापैकी १५ जागा अविरोध निवडण्यात आल्या असून यामध्ये आ. डॉ. विश्वजित कदम, तानाजी पाटील, अमोल बाबर, देवराज पाटील, विराज नाईक, महेंद्र लाड, अपर्णा देशमुख, वर्षा सावंत, पूजा पाटील, नितीन होनराव, वैभव शिंदे, राहूल महाडिक, पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, रणधीर नाईक यांचा समावेश आहे.
