सांगली : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक म्हणजे मॅच  फिक्सिंगचाच प्रकार असल्याचा आरोप करत आपणही सांगली जिल्हा विकास आघाडीच्यावतीने तासगाव सोसायटी गटातून आपली उमेदवारी दाखल करत असल्याचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले. त्यांची लढत माजी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज  जिल्हा बँकेत गर्दी उसळली होती. तत्पुर्वी माध्यमांशी बोलताना माजी खासदार पाटील म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक पक्ष विरहित व्हावी अशी आपली भूमिका आहे.

कारण चांगल्या विचाराच्या व्यक्तींच्या बँकेचा कारभार सोपवला तरच सर्वसामान्य शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. तथापि, बँक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार आणि पालकमंत्री यांच्यात गोपनीय चर्चा होत असेल तर हा मॅच  फिक्सिंगचाच प्रकार वाटतो आहे. नेतेमंडळी सोयीस्कर भूमिका घेत असतील तर आपणही जनतेच्या पाठबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. तासगाव तालुक्यतील अ गटामधून म्हणजे विकास सोसायटी प्रतिनिधी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सांगली जिल्हा विकास आघाडीचा तिसरा पर्याय आपण देणार का असे  विचारले असता ते म्हणाले, बँक चांगल्या लोकांच्या हाती जावी यासाठी आपणा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस नेत्यांच्याकडे चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. विश्‍वजित कदम आणि बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव  नाईक यांच्या माध्यमातून आमदार जयंत पाटील यांच्याकडे तडजोडीचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नसला तरी चर्चेचे पर्याय अद्याप खुले आहेत.  

दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येईल असे जाहीर केल्यानंतर आज विद्यमान संचालक राहूल महाडिक, आमदार सत्यजित देशमुख, सम्राट महाडीक, नीता केळकर आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य विराज नाईक, वाळवा तालुका अध्यक्ष शहाजीबापू पाटील, शिवसेना शिंदे गटाच्यावतीने आमदार सुहास बाबर यांचे बंधू अमोल बाबर, विद्यमान संचालक तानाजी पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तर याअगोदर विद्यमान संचालक  पृथ्वीराज पाटील, सतीश देशमुख, वैभव शिंदे, चिमण डांगे आदींनी उमेदवारी दाखल केली आहे. येत्या दोन दिवसात आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील अथवा मातोश्री शैलजा पाटील, डॉ. जितेश कदम,  शांताराम कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आदीची उमेदवारी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.