सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून यासाठी जिल्ह्यातील १२ केंद्रावर व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे दिली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दि. ३ नोव्हेंबर रोजी सांगली बाजार समितीच्या मिरजेतील शेतकरी भवन येथे मतमोजणी होणार आहे.
 
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १५ संचालकांची अविरोध निवड झाली असून उर्वरित सहा जागासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मिरज, तासगाव, जत व कवठेमहांकाळ विकास संस्था गट, अनूसुचित जाती जमाती आणि विमुक्त जाती, जमाती गट अशा सहा जागासाठी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली आहेत.

मतदान केंद्र आणि मतदार संख्या अशी आटपाडी १६३, कवठेमहांकाळ १५६, विटा १२९, जत १६९, तासगाव १६७, मिरज २११, ईश्‍वरपूर ३३१, शिराळा २२९, पलूस २३६, कडेगाव १६२ आणि सांगली २४०. एकूण मतदार २ हजार ४४६. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणी मिरजेतील जनावर बाजार येथे असलेल्या शेतकरी भवनमध्ये होणार आहे. मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जारी केला आहे.