सांगली : गुप्त मतदान प्रक्रिया असतानाही उमेदवार प्रतिनिधींना दाखवून मतपत्रिका मतपेटीत टाकण्यात येत असल्याचा आरोप झाल्याने जतमध्ये रविवारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर गोंधळ माजला. जिल्हा बॅक  संचालकांच्या सहा जागासाठी जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रावर आज मतदान पार पडले. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला  लागली असून मंगळवारी मतमोजणी होणार आहे.

जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि विनोद पवार यांच्यात सोसायटी गटातून थेट लढत होती. यामुळे या ठिकाणी मोठी चुरस होणे अपेक्षित होते. आ. पडळकर समर्थक मतदार एकत्रच आरामदायी बसने मतदान केंद्रावर आले. आणि त्यांनी समूहाने मतदान केले. यावेळी मतदार मतदान केल्यानंतर मत कोणाला दिले हे उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवून मतपेटीत मतपत्रिका टाकत असल्याचा आरोप श्री. पवार यांचे  प्रतिनिधी सुजयनाना शिंदे यांनी केला. यानंतर गोंधळ माजला, मतदान केंद्रावरच पोलीसांसमक्ष वादावादीही झाली. यानंतर आ. पडळकर यांनी हा आरोप खोडून काढत असा प्रकार घडला  नसल्याचे सांगत आपण बँकेत जाउन सत्ताधारी मंडळींचा गैरकारभार बाहेर काढू या भयाने हा आरोप केला जात असल्याचे सांगितले. आ. जयंत पाटील यांनी बँकेत केलेला गैरकारभार उघड होउ नये यासाठीच आपणस बँकेत येण्यास रोखण्याचे प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, माजी आमदार विक्रम सावंत यांनी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करून लोकशाही मूल्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडलेली नाही. संपूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले असून निवडणूक अधिकार्‍यांनी या आरोपाची चौकशी करून ही निवडणूक रद्द करावी अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.

जिल्हा बँकेच्या जत, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत या तालुका विकास संस्था गटातील चार जागासह अनुसूचित जाती-जमाती व भटक्या विमुक्त जाती-जमाती अशा सहा जागासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली.

खा. विशाल पाटील, आ. जयंत पाटील, डॉ. विश्‍वजित कदम, आ.गोपीचंद पडळकर, आ. रोहित पाटील, आ. सुरेश खाडे यांच्यासह माजी खासदार संजयकाका पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार सुमनताई पाटील आदी नेते मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. आज झालेल्या मतदानाची मोजणी मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी मिरजेतील जनावरे बाजारात असलेल्या सभागृहात होणार आहे.

मोठी चुरस असलेल्या जत व तासगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोनशे ते तीनशे मतदान असलेल्या या निवडणुकीवेळी समर्थकांची होणारी गर्दी लक्षात घेउन दोन्ही ठिकाणच्या वाहतुकीतही बदल करण्यात आला होता.

दरम्यान मतदानाची वेळ संपण्यास एक तासाचा अवधी उरला असताना ८९.९० टक्के मतदान झाले आहे. २४४६ पैकी २१९९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.