सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या सर्वच्या सर्व २१ जागा महायुती म्हणून लढविल्या जातील असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत सांगितले. तसेच पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या दोन्ही जागा आमच्याच असून येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर केले जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेसह पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीत भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख यांच्यासह जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रकाश ढंग, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.
बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले, प्रस्थापितांना सत्तेपासून रोखण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षाना सोबत घेउन महायुती म्हणून सर्व जागा आम्ही लढविणार आहोत. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, रयत क्रांती, जनसुराज्य शयती यांना सोबत घेतले जाणार असून त्यांची स्थानिक पदाधिकार्यांनी बोलणी केली आहेत. मीही संबंधितांशी बोलणार आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत महायुती २१ जागा लढविणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्याशी बोलणी केली जातील. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निवडीवेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी यावेळी शंभूराज देसाई यांच्याशी बोलणी करून महायुतीतील घटक पक्षांची मोट बांधली जाईल असेही त्यांनी सांगितले.
विधान परिषदेचे पुणे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदार संघ हे पारंपारिक आमचेच असल्याचा दावा पालकमंत्री पाटील यांनी केला. मात्र या दोन्ही जागा महायुती म्हणूनच आम्ही लढवणार असून उमेदवारांची नावे येत्या दोन दिवसात जाहीर केली जातील असेही त्यांनी सांगितले. या दोन्ही जागा आमच्या पक्षाच्या असल्या तरी आमचे नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या तिघांमध्ये बैठक होईल आणि उमेदवार निश्चित होईल तो आम्ही मान्य करू असेही ते म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर घेण्यात आलेले आक्षेप आता संपले आहेत हे तीनही आयुक्तांनी एकत्र पत्र परिषदेत स्पष्ट केले आहे. आयोगाने घेतलेले निर्णय संयुक्तपणे घेतले होते हे स्पष्ट झाले असल्याने आक्षेपांना जागा राहिलेली नाही असेही मंत्री पाटील म्हणाले.
